मराठी नाट्यगृहांची दुरावस्था कोणापासूनही लपून राहिलेली नाही. अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी कलाकारांनी नाट्यगृहांची दुरावस्था सर्वांसमोर आणली आहे. यात अभिनेता सुमित राघवन, प्रशांत दामले आणि मुक्ता बर्वे हे कलाकार नाट्यगृहांच्या दुरावस्थेविषयी उघडपणे व्यक्त झाले आहेत. या नंतर आता अभिनेता भरत जाधवने नुकताच एक फेसबुक व्हिडीओ करत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात कलाकारांना मिळत असलेल्या वागणुकीविषयी आणि गैरसोयीविषयी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्या त्याचा हा फेसबुक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत येत आहे.

ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे भरतने एक फेसबुक व्हिडीओ करत त्याचा संताप व्यक्त केला आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये भरतच्या नाटकाचा प्रयोग सुरु होता. यावेळी नाट्यगृहातील एसी बंद होते. अनेक वेळा याविषयी तक्रार करुनही येथील प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे भरत प्रचंड वैतागल्याचं पाहायला मिळालं.

“नाटकाचा प्रयोग सुरु असताना या नाट्यगृहातील एसी बंद आहेत. आम्ही अनेक वेळा तक्रार केली आहे, मात्र आम्हाला केवळ कारणे देण्यात येत आहेत. माझ्याकडे पाहिलं तर तुम्हाला वाटेल मी पावसात भिजलोय, परंतु असं नाहीये. मला हा घाम आला आहे. हे आजचं नाही तर यापूर्वीदेखील अनेक वेळा झालं आहे.मात्र त्याकडे कोणी लक्ष देत नाही”, असं भरत या व्हिडीओमध्ये म्हणाला आहे.

दरम्यान, भरत जाधव यांच्यापूर्वी सुमित राघवन, प्रशांत दामले आणि मुक्ता बर्वे यांनी नाट्यगृहातील दुरावस्थेविषयी त्यांचा संताप व्यक्त केला आहे. मात्र अद्यापतरी नाट्यगृहांची दुरावस्थेबाबत आणि सोयी-सुविधांच्या अभावाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचं दिसून येत आहे.