19 September 2019

News Flash

महोत्सवांमध्ये गौरवलेला ‘कोती’ प्रदर्शनासाठी सज्ज!

दोन भावंडांतील संवेदनशील नातं हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.

अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कारांनी गौरवलेला ‘कोती’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तृतीयपंथीय असलेल्या भावाला समाज का झिडकारतो….. या विचारातून त्या विरोधात दुसऱ्या भावाने दिलेला लढा या आशययसूत्रावर ‘कोती’ बेतला आहे. दोन भावंडांतील संवेदनशील नातं हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. काही मोजके अपवाद वगळता मराठी चित्रपटसृष्टीत तृतीयपंथीयांचा विषय हाताळण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर ‘कोती’ महत्त्वाचा चित्रपट ठरतो.

चित्रपटाचं दिग्दर्शन सुहास भोसले यांनी केलं आहे. वाळू माफियांवर आधारित ‘रेती’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून भोसले यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘कोती’ मध्ये अतिशय महत्त्वाचा विषय हाताळण्यात आला आहे. महोत्सवांमध्ये कौतुक झाल्यानंतर आता प्रेक्षक चित्रपटाला कसं स्वीकारतात याची उत्सुकता आहे. या चित्रपटानंतर समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, अशी अपेक्षा दिग्दर्शक सुहास भोसले यांनी व्यक्त केली.

इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) प्रतिष्ठेच्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात या चित्रपटाची निवड झाली होती. या महोत्सवातही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. भारत सरकारने कान महोत्सवासाठी या चित्रपटाची प्रवेशिका पाठवली होती. त्याशिवाय दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात परीक्षक पुरस्कार, संस्कृती कलादर्पण पुरस्कारांमध्ये लक्षवेधी चित्रपटासह चार पुरस्कार, कोल्हापूर महोत्सवात पाच पुरस्कार पटकावले आहेत.

बालकलाकार अज्ञेश मुडशिंगकर, दिवेश मेदगे अभिनेते संजय कुलकर्णी अभिनेत्री विनीता काळे यांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद राजेश दुर्गे यांचे असून कॅमेरामन म्हणून भरत आर. पार्थसारथी यांनी काम पाहिले आहे. संजय नवगिरे यांनी लिहिलेल्या गीताला बबन अडगळे आणि मनोज नेगी यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीतदेखील त्यांचेच आहे. सागर वंजारी यांनी चित्रपटाचे संकलन केले असून शंकर धुरी हे कार्यकारी निर्माते आहेत. तर कला दिग्दर्शन देवदास भंडारे यांचे आहे. असा हा वेगळ्या धाटणीचा ‘ओएमएस आर्ट्स’ निर्मित ‘कोती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

koti

First Published on May 9, 2016 12:30 pm

Web Title: marathi movie koti ready to release