सत्तरच्या दशकात मराठी समाजजीवन आजच्याइतकं व्यामिश्र व गुंतागुंतीचं नव्हतं. सहसा सरळमार्गी(च) आयुष्य जगणारी बहुसंख्य माणसं.. त्यांचं नाकासमोर चालणं.. नातेसंबंध जपणं, जिव्हाळा, आत्मीयता या मूल्यांचा आदर करणं असं सर्व यथास्थित होतं. आणि त्याचं प्रतिबिंब तेव्हाच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नाटकांतून पडलेलं दिसे. याचा अर्थ समाजात सारं काही आलबेल होतं असं नाही. विजय तेंडुलकरांच्या नाटकांतून ते अस्पर्श विश्व मुखर होत होतंच. पण ते स्वीकारायला समाज धजावत नव्हता. पुढे १९९१ च्या जागतिकीकरणाच्या झंझावाताने सगळंच उलटंपालटं केलं. माणसाचं जगणं, त्याचं भावविश्व, त्याची विचार करण्याची पद्धत, त्याचं टोकाचं व्यक्तिवादी होणं, जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उरीपोटी धावणं.. या सगळ्या उरस्फोडीतून आजचा माणूस ‘घडला’ आहे. साहजिकच त्याचे पडसाद साहित्यादी कलांतून उमटणं स्वाभाविकच. कायम प्रगतीशील राहिलेलं मराठी नाटक आज अशा टप्प्यावर आहे, की भवतालाचं रोखठोक चित्रण त्यातून व्यक्त होताना दिसतं.

या पाश्र्वभूमीवर नुकतंच ‘स्वप्नपंख’ हे मनिषा कोरडे लिखित आणि संपदा जोगळेकर-कुळकर्णी दिग्दर्शित नाटक पाहण्यात आलं आणि सत्तरच्या दशकातील नाटकांची याद ताजी झाली.

निवृत्त लष्करी अधिकारी असलेल्या कर्नलची एकुलती एक मुलगी राजू. काहीशी अस्थिर मनोवृत्तीची. तिची देखभाल व संगोपन करण्यासाठी त्यांनी तिच्या जन्मापासून एक गव्‍‌र्हनेस (लीलाबाई) ठेवलेली. कारण तिची आई तिच्या जन्मानंतर लगेचच गेली होती. राजूच्या अस्थिर मनोवृत्तीमुळे लीलाबाई तिला सतत धाकात ठेवत.. जेणेकरून तिनं एखादं वेडवाकडं कृत्य करू नये. राजूला या मनोवस्थेतून बाहेर काढण्यासाठी कर्नलनी सगळे उपाय करून पाहिले. पण कशाचाच उपयोग झाला नाही. तिला संगीताचं शिक्षण देण्यासाठी एक गुरू ठेवण्यात आले होते. परंतु वाढत्या वयाच्या राजूच्या बाबतीत नस्ता धोका पत्करायला तयार नसणाऱ्या लीलाबाईंनी त्यांची ही शिकवणी बंद केली होती. वयात येऊ घातलेल्या राजूच्या या अवस्थेमुळे चिंताक्रांत झालेल्या कर्नलनी तिला पुरुष सहवास मिळावा म्हणून मानसोपचारतज्ज्ञ चेतनची नेमणूक करायचं ठरवलं. त्याकरता त्याला बोलावणं धाडलं. कर्नलनी आपला हा मनोदय त्याच्याकडे व्यक्त केला. त्यांच्या त्या विचित्र प्रस्तावाने संतापलेल्या चेतनने तो साफ धुडकावून लावला. ‘राजूला मानसोपचारांची गरज आहे; पुरुष सहवासाची नाही,’ हे त्याने कर्नलसाहेबांना स्पष्टपणे सांगितलं. कर्नलनाही ते पटलं. त्यांनी ते मान्य केलं आणि चेतनला त्याच्या पद्धतीनं तिच्यावर उपचार करण्याची मुभा दिली.

पण लीलाबाईंना हे बिलकूल मंजूर नव्हतं. एका पुरुषाच्या सहवासात राजूला ठेवू देण्यानं अनर्थ घडू शकेल असं त्यांचं मत होतं. मात्र, त्यांचा विरोध डावलून कर्नलनी चेतनला हिरवा कंदील दाखवला. लीलाबाईंची अतिरेकी दहशत राजूच्या या अवस्थेस कारण आहे हे चेतनच्या लगेचच लक्षात आलं. त्याने कर्नलना लीलाबाईंना ताबडतोब कामावरून काढून टाकण्यास सांगितलं. परंतु काही कारणांनी कर्नल लीलाबाईंना कामावरून काढू शकत नव्हते..

ते कारण नेमकं काय होतं? लीलाबाई राजूशी अशा का वागत होत्या? कर्नलसाहेबांची अशी काय दुखरी बाजू होती, की ते लीलाबाईंना काढू शकत नव्हते? राजू आपल्या पित्यापासून दूर दूर का राहत होती? कर्नल आपल्या मुलीचा विश्वास का संपादन करू शकले नव्हते?.. या प्रश्नांची उत्तरं मिळवायची तर ‘स्वप्नपंख’ पाहणं अगत्याचं ठरेल.

‘स्वप्नपंख’च्या लेखिका मनिषा कोरडे यांनी पूर्वी एक प्रेमकथा नाटय़रूपात सादर केल्याचं आठवतं. त्यानंतर त्या सिनेक्षेत्रात गेल्या आणि तिथंच रमल्या. आणि आता खूप वर्षांच्या खंडानंतर त्यांचं हे नवं नाटक रंगमंचावर आलं आहे. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. मराठी रंगभूमीनंही बरीच स्थित्यंतरं अनुभवलीत. तथापि ‘स्वप्नपंख’मध्ये मात्र ही जाणीव प्रत्ययाला येत नाही. त्याची रचना जुनीच आहे. राजूच्या कहाणीत एक रहस्य दडलेलं आहे; परंतु तेवढय़ानं नाटक नवं ठरत नाही. फ्लॅशबॅक तंत्रानं नाटक पुढं सरकतं. कथाबीजातलं रहस्य हा या नाटकाचा ‘यूएसपी’ आहे. एक मात्र आहे.. की ठरीव साच्यातला हा मेलोड्रामा असूनही तो प्रेक्षकाला बांधून ठेवतो. यातली लीलाबाईंची व्यक्तिरेखा संपूर्ण काळ्या रंगात रंगविण्याची गरज नव्हती. आपल्या मुलीला पुरुष सहवास मिळवून दिला तर ती बहकणार नाही, हे कर्नलसाहेबांचं गृहितक त्यांच्या व्यवहारवादी विचारांतून आलेलं असलं तरी त्याने तिची समस्या सुटणारी नाही, हे त्यांच्या कसं लक्षात येत नाही? इतक्या टोकाला जाण्याइतपत राजूच्या हातून काय घडलं होतं? लीलाबाई राजूचं नीट संगोपन करत नाहीयेत, तिला धाकदपटशा दाखवून तिच्या नाजूक अवस्थेत आणखीन भरच घालताहेत, हे स्वच्छ दिसत असूनही कर्नल काहीच करत नाहीत. बरं, त्यांना अज्ञात कारणांमुळे हे शक्य झालेलं नाही, हे एक वेळ मान्य केलं तरीही त्यांनी मानसोपचारतज्ज्ञांकरवी राजूवर याआधीही उपचार केलेले असतात. त्यांच्याही ही गोष्ट ध्यानी येऊ नये? असो. असे काही अनुत्तरित प्रश्न नाटक पाहताना पडतात. नाटकात पंपी हे पात्र केवळ विरंगुळ्यासाठी योजलं आहे. हेही सत्तरच्या दशकातल्या नाटकांना साजेसंच.

दिग्दर्शक संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी नाटकाचा पिंड ओळखून ते मेलोड्रामाच्या अति आहारी जाणार नाही याची दक्षता घेतली आहे. मात्र, लीलाबाईंच्या व्यक्तित्वाला दुसरे कसलेच कंगोरे का नाहीत, हा प्रश्न दिग्दर्शक म्हणून त्यांना का पडला नाही? राजूची मनोरुग्णाईत अवस्था लीलाबाईंनीच केलेली आहे. ती तशी करताना त्यांच्यातल्या कोमलहृदयी स्त्रीला आपण हे चुकीचं करतो आहोत, असं कधीच वाटलं नसेल? कर्नलनी आपल्या मुलीच्या निकट जाण्याचे तत्पूर्वी कधी प्रयत्न केले होते का? आणि केले असल्यास ते नेमके का निष्फळ ठरले? असे प्रश्न नाटक पाहताना पडतात. त्यांची उत्तरं दिग्दर्शकानं लेखकाकडून मिळवणं आवश्यक होतं. मात्र, संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी संहितेबरहुकूम चोख प्रयोग बसवला आहे.

नेपथ्यकार राजन भिसे यांनी विविध घटनास्थळांची मागणी करणारं कर्नलचं प्रशस्त, आलिशान घर यथार्थपणे साकारलं आहे. परिक्षित भातखंडेंनी पाश्र्वसंगीतातून नाटकातील भावप्रक्षोभ गहिरा केला आहे. योगेश केळकरांनी प्रकाशयोजनेद्वारे त्यांना सुयोग्य साथ दिली आहे. स्वरांगी मराठे यांच्या गायनाचा नाटकात चपखल वापर झाला आहे. तीच गोष्ट नकुल घाणेकरांची. त्यांनी नृत्यआरेखन केलं आहे. वेशभूषा महेश शेरला यांची आहे, तर रंगभूषा संदीप नगरकर व प्रदीप दर्णे यांनी केली आहे.

राजन भिसे यांनी कर्नलचं एकाकी, तर्कशुद्ध, व्यवहारी तसंच कमालीचं भावुक व्यक्तिमत्त्व दिसण्या-वागण्यातून उत्तम साकारलं आहे. लीलाबाईंचं कोरडंठाक, दहशती रूप संपदा जोगळेकर-कुळकर्णीनी गडद काळ्या रंगात रंगवलं आहे. लीलाबाईंनी शेवटी दिलेला कबुलीजबाब त्यांच्यातल्या दुखावल्या गेलेल्या स्त्रीचा एल्गार असला तरीही त्याला कारुण्याचं हलकंसं अस्तर असतं तर ही व्यक्तिरेखा अधिक ‘मानवी’ झाली असती. स्वरांगी मराठे यांनी राजूचं मनोरुग्णाईत रूप, तसंच चेतनच्या येण्यानं तिच्यात झालेलं सकारात्मक स्थित्यंतर नेमकेपणाने दर्शवलं आहे. त्यांचं गाणं तर सुंदर आहेच. नकुल घाणेकरांचा चेतन हा संयत, विचारी आहे. तनुजाचं (प्रेयसी) बिथरणं सोसूनही तो आपल्या कामाशी प्रतारणा करत नाही, हे महत्त्वाचं. पंपीच्या चळवळ्या भूमिकेत विवेक राऊत फिट्ट बसले आहेत. ज्ञानदा पानसेंनी चेतनच्या प्रेयसीचा संशयात्मा अचूक टिपला आहे.