मनोरंजन…. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीशी उसंत मिळाल्यावर अनेकांचं मन रुळवणारा एक घटक. मनोरंजनाच्या विविध साधनांना आणि माध्यमांना प्रत्येकाची पसंती असते. त्यातीलच एक माध्यम म्हणजे चित्रपट. बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंतच्या जवळपास अनेक चित्रपटांचे लाखो-करोडो रसिक स्वत:ला कट्टर चित्रपटप्रेमी म्हणवतात. अनेकजण तर त्यांचा हा स्वयंघोषित कट्टरपणा सिद्धही करतात. चित्रपटाच्या संवादांपासून ते अगदी लहानातल्या लहान व्यक्तिरेखेपर्यंतची माहिती ठेवणाऱ्या या चाहत्यांचे कधीकधी कलाकारांनाही कुतुहल वाटते. तुम्हालाही जर स्वत:ला चित्रपटांबद्दल विलक्षण प्रेम वाटत असेल, तर चला, सिने ‘नॉलेज’च्या या गुंतागुंतीच्या एका प्रश्नाचं उत्तर देत सिद्ध करा तुमचं रसिकत्व..

प्रश्न : अदिती राव हैदरीने कोणत्या मराठी चित्रपटात काम केले होते?
पर्याय-
१. कट्यार काळजात घुसली
२. रमा माधव
३. बालगंधर्व

भरतनाट्यम नर्तकी असलेल्या अदिती राव हैदरीने २००६ सालच्या ‘श्रींगारम’ या तमिळ चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल्ली-६’ या हिंदी चित्रपटामध्ये तिने छोटी भूमिका साकारली होती. तर २०१३ मध्ये आलेल्या ‘मर्डर ३’ या चित्रपटात तिने सारा लॉरेनसोबत सह-नायिकेची भूमिका साकारली होती. ‘रॉकस्टार’, ‘खुबसूरत’, ‘वझिर’, ‘फितूर’, ‘गुड्डू रंगीला’, ‘बॉस’, ‘ये साली जिंदगी’ या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. ‘ये साली जिंदगी’, ‘रॉकस्टर’, ‘मर्डर ३’ या चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकांकरिता तिला विविध पुरस्कारांसाठीचे नामांकन मिळाले होते. याव्यतिरीक्त तिने ‘ममाज् बॉइज’ या लघुपटामध्येही काम केले आहे. मात्र, या लघुपटामध्ये महाभारतातील व्यक्तिरेखांची खिल्ली उडवण्यात आल्याने बरीच टीका झाली होती. नीना गुप्ता, अदिती राव हैदरी, अरुणोदय सिंग, अमोल पाराशर, अक्षय ओबेरॉय, टीना सिंग, जिम सर्भ, रजाक खान आणि इशा चोप्रा यांनी या लघुपटात काम केले आहे.