|| भक्ती परब

एक सून लग्न करून घरात येते. घरात पाऊल टाकण्यापूर्वीच तिने सासरी आल्यावर काय काय डावपेच खेळायचे याची तयारी केलेली आहे. हुशारीने तिने घरातल्या माणसांभोवती आपल्या चांगुलपणाचं जाळ विणलं आहे. एक श्रीमंत कुटुंबाची सून असली तरी तिचा मनसुबा काही वेगळाच आहे. ती एकेक करून आपले डावपेच खेळते आहे. पण कुणाला ताकास तूर लागू देत नाही. तरीही ती आदर्श सून हे बिरुद मिरवते आहे.. अलीकडे बऱ्याच मालिकांमधून साधारणपणे अशाच आशयाचं कटकारस्थान दाखवण्यात येत आहे. नात्यांमधला भावनिक बंध मालिकांमधून आता हद्दपार होतो आहे. त्याची जागा नात्यांमधील हुशारी आणि डावपेचांनी घेतली आहे. त्यामुळे मालिकांमधील व्यक्तिरेखा सतत काहीतरी धोरणं आखताना दिसतात. प्रेमाने मनं जिंकण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात. या वर्षभरात जानेवारीपासून आलेल्या हिंदी-मराठी मालिकांवर नजर टाकल्यावर हे सहज लक्षात येतं.

‘स्टार प्लस’, ‘कलर्स’, ‘झी टीव्ही’, ‘सोनी टीव्ही’, ‘अ‍ॅण्ड टीव्ही’, ‘सोनी सब’ या वाहिन्यांवरील मालिका, कथाबाह्य़ कार्यक्रमात मराठी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि महाराष्ट्राशी जोडले जाण्यासाठी मराठी कलाकारांचा हुकमी एक्के म्हणून वापर केला जातो. त्यामुळे या हिंदी मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांमध्ये मराठी कलाकार दिसतात आणि रिअ‍ॅलिटी शोजमध्ये कुणी मराठी स्पर्धक असेल तर तो मराठीत साद घालताना दिसतो. हिंदी मनोरंजन वाहिन्यांचं आव्हान असतानाच हिंदी चित्रपट वाहिन्यांचंही आव्हान प्रादेशिक वाहिन्यांसमोर आहे.

गेल्या दोन आठवडय़ांत टीआरपीच्या शास्त्राने चित्रपट वाहिन्या वरचढ ठरल्याचे सांगितले. त्यामुळे यापुढील दोन आठवडय़ांत हिंदी आणि प्रादेशिक वाहिन्यांवर नव्या चित्रपटांचे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर एकापाठोपाठ एक दाखवले जाणार आहेत. गेल्या आठवडय़ात ‘सिम्बा’ ने प्रेक्षकांची मनं जिंकल्यावर ‘अ‍ॅण्ड पिक्चर्स’ वाहिनीवर विकी कौशल, तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन यांचा ‘मनमर्जिया’ चित्रपट रविवारी रात्री ८ वाजता दाखवण्यात येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘येरे येरे पैसा’ हा चित्रपट रविवारी पाहायला मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी उत्सुकता असायची की नवा चित्रपट कुठल्या वाहिनीवर पहिल्यांदा पाहायला मिळेल, पण आता ती उत्सुकता राहिली नाही. कारण चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जातो तेव्हा चॅनल पार्टनर या शीर्षकाखाली एका वाहिनीचं नाव येतं. त्यामुळे कळतं की तो कुठल्या वाहिनीवर लवकरच पाहायला मिळेल.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस २’ आणि ‘लक्ष्मी-नारायण’ हे दोन कार्यक्रम २६ आणि २७ मेपासून सुरू होत आहेत. तसेच जुलै महिन्यापासून ही वाहिनी अजून नव्या कार्यक्रमांसह तिचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. जून आणि जुलै दरम्यान अनेक नव्या कार्यक्रमांची भर पडणार आहे. तसेच ‘भाई : व्यक्ती की वल्ली’, ‘ठाकरे’, ‘कागर’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांना या वाहिनीवर पाहायला मिळतील.

‘स्टार प्रवाह’वरील ‘विठुमाऊ ली’ या मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले. मालिकेत सध्या विठुरायाच्या मंदिराच्या उभारणीचा प्रवास पाहायला मिळतोय. अडथळ्यांवर मात करत पुंडलिक मंदिराची उभारणी कशी करणार?, हे यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

‘झी मराठी’वर ‘चला हवा येऊ  द्या – शेलिब्रिटी पॅटर्न’ हे नवं पर्व आठवडय़ातून ४ दिवस पाहायला मिळणार आहे. तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत लवकरच गुरूची चोरी पकडली जाणार आहे. त्याचबरोबर नुकत्याच झळकलेल्या प्रोमोतून गुरुनाथ पायऱ्यांवरून पडताना दाखवण्यात आलं आहे. येत्या आठवडय़ात हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे.

हिंदी मनोरंजन वाहिन्यांवर नजर टाकली तर सध्या परीक्षक, सूत्रसंचालक आणि निवेदकाच्या स्वरूपात अवघं बॉलीवूड छोडय़ा पडद्यावर अवतरलं आहे, हे सहज लक्षात येईल. अभिनेत्री करिश्मा कपूर हिने करिना कपूर ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये परीक्षक म्हणून भूमिका बजावणार हे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे भाईजान सलमानने हिंदी ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन करणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘बिग बॉस’च्या या तेराव्या पर्वात सर्वच कलाकार असल्याचं बोललं जातंय. तसंच शोमध्ये अनेक बदल करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी शाहरुख खान ‘टेड टॉक्स’ हा कार्यक्रम ‘स्टार प्लस’वर हिंदीतून घेऊ न आला होता. त्याचा दुसरा सीझन लवकरच येणार आहे. त्याच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. पहिले पर्व फक्त आठ भागांचे होते. प्रत्येक भागातून खूप काही शिकायला मिळाले होते. त्यातील एकता कपूर आणि जावेद अख्तर, करण जोहर, विकास खन्ना यांचे टेड टॉक गाजले होते. त्यामुळे दुसऱ्या पर्वात शाहरुख कोणाला बोलावणार याची उत्सुकता आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित ‘डान्स दिवाने’ या नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी शोचं दुसरं पर्व घेऊ न लवकरच दाखल होते आहे. तर सैफ अली खान निवेदकाच्या भूमिकेत ‘कहाँ हम, कहाँ तुम’ या ‘स्टार प्लस’वरील मालिकेतून १७ जूनपासून दिसणार आहे.