हिंदी चित्रपटांतून दाखविलेल्या त्याच त्याच गोष्टींचा पगडा प्रेक्षकांवर कायमचा राहतो याचा अनुभव ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने पुन्हा दिला आहे. नवरसयुक्त जुन्या हिंदी चित्रपटांप्रमाणेच ब्रॅण्ड सलमान खानच्या या नव्या चित्रपटात हिंदी-मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्याबरोबरच भारत-पाक यांच्यातील तेढ असली तरी माणुसकी सर्वश्रेष्ठ ठरते हे सांगण्याचा चावून चोथा झालेला विषय पूर्ण मेलोड्रामासह मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. गेल्या काही चित्रपटांपेक्षा सलमान खानचा हा चित्रपट काही बाबतीत निराळा आहे. बेगडीपणाचा कळस अनेक ठिकाणी चित्रपटात करण्यात आला असून फक्त सलमान खानच्या असंख्य चाहत्यांच्या नजरेत त्याची गेल्या काही वर्षांत न दाखविलेली चित्रपटीय प्रतिमा पडद्यावर दाखविण्याचा प्रयत्न सिनेमाने केला आहे. अतिरंजित मेलोड्रामाचा उत्तम नमुना पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आला आहे.
भारत-पाकमधील क्रिकेटची मॅच, त्या मॅचवरून उभय देशांमधील क्रिकेटरसिक आपली तथाकथित देशभक्ती व्यक्त करण्याची संधी घेतात. याच प्रकारची संधी दिग्दर्शक-निर्मात्यांनी या सिनेमाद्वारे शोधली आहे. हिंदी सिनेमामध्ये ‘कमर्शियल देशभक्ती’प्रमाणेच ‘हिंदू-मुस्लीम ऐक्य’, भारत-पाक मैत्री आणि उभय देशांतील लोकांच्या भावनांवर आधारित सिनेमांचे प्रयत्न खूप झाले आहेत. ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमात त्याचीच री ओढण्याचा प्रभावी प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. सलमान खान म्हणजे सुपर अ‍ॅक्शन, पाणचट-फुसके, पण प्रेक्षकांना हसू आणणारे विनोद याला छेद देऊन त्याची प्रतिमा साधी-सरळ, गरीब कॉमन मॅनची दाखवितानाच सलमान खान बजरंगबलीचा निस्सीम भक्त दाखविला आहे. हिंदू-मुस्लीम दोन्ही चाहत्यांना-प्रेक्षकांना सलमान खानची ‘माणुसकी’ सिनेमातून दाखविण्याचा प्रयत्न हा सिनेमा करतो.
गोष्ट एकदम टिपिकल आहे. एक लहान मुलगी पाकिस्तानातून भारतात आईबरोबर मशिदीला भेट देण्यासाठी येते. ‘मन्नत’ मागून झाल्यावर समझौता एक्स्प्रेसने पुन्हा पाकिस्तानला जाताना मुलगी हरवते आणि भारतातच राहते. भरीस भर म्हणून आणि प्रेक्षकांची सहानुभूती मिळावी म्हणून ही पाच-सहा वर्षांची गोड दिसणारी चिमुरडी मुकी दाखवली आहे, तर आई रेल्वेने पाकिस्तानात निघून गेल्यावर ही चिमुरडी दुसऱ्या मालगाडीत चढते आणि फिरत फिरत बजरंगी ऊर्फ पवन चतुर्वेदीला भेटते. मग या मुक्या मुलीला बजरंगी पवन ‘मुन्नी’ असे नाव देतो आणि त्याला जेव्हा समजते की, ही पाकिस्तानातून इथे आली आहे तेव्हा तिला तिच्या मायदेशी स्वत: पोहोचविण्याचे ठरवितो. मुन्नीला तिच्या आई-वडिलांकडे पाकिस्तानात पोहोचवेपर्यंतचा प्रवास सिनेमात दाखविला आहे. खूप बाष्कळ विनोदही नाहीत, सलमानचे अ‍ॅक्शन सीक्वेन्स अगदी कमी आहेत. त्यामुळे निस्सीम सलमान चाहत्यांची किंचित निराशा होऊ शकते. लेखक-दिग्दर्शकांनी खुबीने साकारलेली पटकथा हेच या सिनेमाचे यश आहेच; परंतु संगीत प्रभावी नाही, गाणी सरस नाहीत. त्यामुळेही सलमान चाहत्यांची निराशा होऊ शकते.
करिना कपूर ही पवनची प्रेयसी दाखवली असली तरी एखाद्या पाहुण्या कलाकारापेक्षा खूप महत्त्व तिला चित्रपटात नाही. मुन्नी ऊर्फ शाहिदा या भूमिकेतील बालकलाकार हर्षांली मल्होत्राने मुकी मुलगी उत्तम साकारली आहे. वास्तवात कधीही घडणार नाही अशी गोष्ट घडविण्याचा हिंदी सिनेमाने फार पूर्वीच विडा उचलला आहे. त्यामुळे तर्कविसंगत गोष्टींबाबत विधान करण्यात काहीच अर्थ नाही. कारण हा सलमान खानचा सिनेमा आहे, फक्त त्याच्या चाहत्यांसाठी बनविलेला आहे आणि गल्लापेटीवर लक्ष ठेवून प्रेक्षकांना नवरसपूर्ण अतिरंजित मेलोड्रामा करमणूक देण्याच्या भूमिकेतूनच त्याकडे पाहायला हवे.

बजरंगी भाईजान
निर्माते – सलमान खान, रॉकलिन वेंकटेश
दिग्दर्शक – कबीर खान
कथा – व्ही. विजयेंद्र प्रसाद
पटकथा – व्ही. विजयेंद्र प्रसाद, कबीर खान, परवीझ शेख, असद हुसैन
संवाद – कबीर खान, कौसर मुनीर
कलावंत – सलमान खान, करिना कपूर, हर्षांली मल्होत्रा, नवाझुद्दिन सिद्दिकी, ओम पुरी, अली कुली मिर्झा, शरत सक्सेना, अदनान सामी, नझीम खान, कमलेश गिल