News Flash

‘एमएच ०२ डीएल ५२६२’ शरीरधर्माची असह्य़ घुसमट

मानवी शरीर हे विकार-वासनांनी बद्ध आहे. पुरुष वा स्त्री अशा कुणालाच त्या चुकलेल्या नाहीत. परंतु त्यामुळे समाजात वा व्यक्तिजीवनात उत्पात घडू नयेत, कुटुंब व समाजव्यवस्था

| March 8, 2015 07:25 am

मानवी शरीर हे विकार-वासनांनी बद्ध आहे. पुरुष वा स्त्री अशा कुणालाच त्या चुकलेल्या नाहीत. परंतु त्यामुळे समाजात वा व्यक्तिजीवनात उत्पात घडू नयेत, कुटुंब व समाजव्यवस्था सुरळीत चालावी यासाठी व्यक्तीच्या विकार-वासनांवर बंधने घालून ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न मानवी प्रगतीच्या वाटचालीत होत rv09आलेला आहे. अर्थात या र्निबधामुळे समाज आणि कुटुंबसंस्था वरकरणी जरी सुरळीत चालत असल्याचं भासत असलं तरीही खरं तर तो एक भास असतो. याचं कारण सामाजिक र्निबधांमुळे एकीकडे कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य टिकत असलं तरीही बऱ्याचदा या र्निबधांपायी व्यक्तीची मानसिक,भावनिक आणि शारीरिक कुचंबणाच होत असते. विशेषत: स्त्रियांची! (कारण पुरुष यातून काही ना काही मार्ग काढतात.) कौटुंबिक तसंच सामाजिक दायित्व, कुटुंबाची आणि आपली इभ्रत, निकटच्या नात्यांप्रती असलेली जबाबदारी अशा अनेक बंधनांच्या काचांमध्ये स्त्री इतकी अडकलेली असते, की आपणही हाडामांसाचे माणूस आहोत, इतरांसारखंच आपल्यालाही शरीर आहे, त्याच्या काही गरजा आहेत, याकडे दुर्लक्ष करून वा त्या दडपून टाकून तिला कधी कधी जगावं लागतं. प्राप्त परिस्थिती आणि समाजर्निबधांनी तिला जखडून टाकलेलं असतं. त्याविरुद्ध तिला बंडही करता येत नाही. आणि समजा केलंच, तर त्याची जबर किंमत मोजावी लागते. कुटुंबापासून समाजापर्यंत सर्वाकडून या अपराधाकरता तिला धिक्कारलं जातं.. तिला वाळीत टाकायलाही कुटुंब व समाज कमी करत नाही. म्हणून मग या बहिष्कृततेपासून वाचण्यासाठी ती आपल्या भावभावना, विकार-वासना दाबून टाकण्याचा प्रयत्न करते. तिचा हा अंतर्गत झगडा इतरांना दिसत नाही. परंतु तो सुरूच असतो. त्यापासून तिची सुटका नसते. तिला कुणापाशी तो उघडपणे व्यक्तही करता येत नाही. आणि समजा तिनं तो केला, तरी समोरची व्यक्ती ते कशा प्रकारे घेईल याची शाश्वती नसते. त्यामुळे शक्यतो आपल्या भावना जगापासून लपवण्याकडेच तिचा कल होतो. आणि अगदीच सारं असह्य़ झालं की अपरिहार्यपणे ती मानसिक विकाराला बळी पडते.

मिलिंद बोकील यांच्या ‘संकेत’ या कथेवर आधारित ‘एमएच ०२ डीएल ५२६२’ हा दीर्घाक स्त्रीची ही कोंडी विलक्षण उत्कटपणे व्यक्त करतो. खरं तर नाटकाच्या नावातून कसलाच अर्थबोध होत नाही. हा वाहनाचा नंबर आहे, एवढं कळतं. परंतु त्यातून विषय मात्र कळत नाही. कदाचित नाटककर्त्यांचीही तशीच इच्छा असावी. जेणेकरून हे काय नाटक असावं बरं, या उत्सुकतेनं प्रेक्षक त्याकडे वळतील!
बोकिलांच्या या कथेचा जीव अगदीच लहान आहे. एक स्त्री.. (बहुधा घटस्फोटित वा नवऱ्यापासून वेगळी राहणारी!) आपल्या शाळकरी मुलाचं एकटय़ानंच पालकत्व निभावणारी. नोकरी करून आपलं घर टुकीनं चालवणारी. वयानुरूप थोडासा खोडकर असला, तरी मुलगाही तसा गुणी. अभ्यासू. तिचं अवघं आयुष्यच आता त्याच्याभोवती केंद्रित झालेलं. त्यापायी ना स्वत:ची कसली हौसमौज, ना स्वत:साठी जगणं. ऐन तारुण्यात एकटेपण वाटय़ाला आलेली अशी ‘ती’! पण शरीरधर्म कुणाला चुकलाय? तीही याला अपवाद नाही. कुटुंब व समाजाच्या बागुलबुवापायी भावना कितीही काबूत ठेवायचा प्रयत्न केला तरी कधीतरी तिचंही शरीर बंड करून उठतंच. ते आपल्या गरजेची पूर्तता करायची मागणी करतं. अशा वेळी तिला विलक्षण अस्वस्थपण येतं. ती प्रचंड बेचैन होते. ‘तो’ क्षण तिनं कितीही निकरानं झिडकारायचा प्रयत्न केला तरी कधीतरी तिची हार ही होतेच. अशावेळी जिवाची भयंकर तगमग होते.
अशा एका जीवघेण्या क्षणी कुणीतरी अनाम तिच्या आयुष्यात आलाय. तीन-चार महिन्यातून एखाद्या संध्याकाळी तिच्या घरी होणाऱ्या त्यांच्या एकांतभेटीनं ती मोहरते. मन अन् शरीर फुलून येतं. त्या चुकार क्षणांची ती मग पुढील भेट होईतो आतुरतेनं वाट पाहत राहते. मुलाच्या अपरोक्ष या चोरटय़ा भेटीच्या वेळी तिची विलक्षण घालमेल होते. एकीकडे मुलाच्या मनात आई म्हणून असलेली आपली प्रतिमा जपायची असते, तर दुसरीकडे आपल्या शरीराची आक्रंदणारी सादही तिला नाकारता येत नाही. या उलघालीत तिची भीषण कुतरओढ होते.
एकदा असाच ‘तो’ संध्याकाळी घरी येणार असतो. त्याच्या ओढीसाठी तिचं तन-मन आतुरलेलं असतं. तेवढय़ात मुलगा शाळेतून घरी येतो. चहा-नाश्ता करून नेहमीप्रमाणे तो आपल्या मित्रांबरोबर खेळायला जाईल आणि आपल्याला हवा तो एकांत मिळेल, म्हणून लगबगीनं ती त्याला खाऊपिऊ घालते. पण त्याला आज मित्रांबरोबर खेळायला जायचा कंटाळा आलेला असतो. ती मात्र त्याला काहीही करून खेळायला पाठवू पाहते.
एव्हाना ‘तो’ यायची वेळ झालेली असते. तिची अस्वस्थता वाढते. पण मुलगा काही खेळायला जात नाही. ती आधी समजुतीनं, नंतर हट्टाग्रहानं त्याला बाहेर पाठवू बघते. पण तो ऐकत नाही. तेव्हा ती चिडते. काहीतरी काम काढून त्याला घराबाहेर पाठवायचं म्हटलं तरी तसं कुठलंच काम तिला सुचत नाही. ती मग त्याच्यावर चिडते. रागावते. त्याला हिडिसफिडीस करते. तरीही तो जात नाही. आपली आई आज अशी का वागतेय, हे त्याला समजत नाही.
इतक्यात बाहेर ‘त्याची’ मोटरबाईक आल्याचा परिचित आवाज तिला ऐकू येतो. तिची बेचैनी अधिकच वाढते. खिडकीतून डोकवायचं तरी पंचाईत. एवढय़ात मोबाइलची रिंग वाजते. मुलगा तो उचलतो. तेव्हा वाघिणीसारखी चवताळून ती त्याच्याकडून फोन हिसकावून घेते आणि तो कट् करते.
मुलाला आता घराबाहेर कसं घालवावं, हे तिला सुचत नाही. एकीकडे ‘त्याच्या’ भेटीसाठी आतुरलेलं शरीर अन् मन आणि दुसरीकडे मुलाचा हा हटवादीपणा..  
एवढय़ात मुलाला आपण मित्राची वही द्यायचं विसरल्याचं आठवतं. तो आईला, मित्राची वही द्यायला जाऊ का, म्हणून विचारतो. तिचा क्षणभर आपल्या भाग्यावर विश्वासच बसत नाही. ती विलक्षण आवेगानं त्याला जायला सांगते.
मुलगा निघून जातो.. पण लगेचच परत येतो. त्याला आठवतं, मित्र गावाला गेलाय आणि त्याला आजच वही द्यायची गरज नाही.
त्याच्या लवकर परत येण्यानं तिची उरलीसुरली आशा धुळीस मिळते. ती एखाद्या शत्रूसारखी मुलाच्या अंगावर धावून जाते. मुलगा घाबरून मार चुकवू बघतो.. थोडय़ा वेळानं ती भानावर येते. आपण काय करत होतो, याची तिला भयंकर शरम वाटते. मघापासूनच्या विलक्षण भावनिक ताणामुळे थकलेली ती..! तोवर गाढ झोपी गेलेल्या मुलाला जवळ ओढून ती आपल्या दु:खाला वाट करून देते..
अत्यंत छोटा जीव असलेल्या या कथेचं विश्वास सोहोनी यांनी सुंदर नाटय़रूपांतर केलेलं आहे. एका कातर संध्याकाळचा आई-मुलातल्या अबोल संघर्षांचा तासा- दीड तासाचा हा खेळ! विकारवासना आणि मुलाच्या मनातली आपली आई म्हणून असलेली प्रतिमा जपण्याची जबाबदारी यांच्यातलं हे विलक्षण द्वंद्व सोहोनी यांनी कमीत कमी संवादांतून अत्यंत धारदारपणे उभं केलं आहे. संवादांतील रिक्त जागा आई-मुलामधील व्यक्त-अव्यक्त ताणांतून इतक्या सूक्ष्मरीत्या आणि तपशिलांनिशी त्यांनी भरल्या आहेत, की नकळतच आपण त्या सुन्न करणाऱ्या अनुभवाचे भागीदार होऊन जातो. ‘ती’चा स्वत:शी आणि आपल्या वासनेशी चाललेला झगडा तसंच मुलाच्या मनातली आपली प्रतिमा जपण्यासाठीचा तिचा आटापिटा अत्यंत तरलतेनं प्रयोगात उतरला आहे. मुलाचा साधा-सरळ निरागस भाव आणि आईच्या अनाकलनीय वागण्यानं त्यानं अचंबित होणं, या गोष्टीही त्याच सहजतेनं प्रतिबिंबित होत असल्यानं नाटक मानवी संवेदनेचा परमोच्च बिंदू गाठतं. दिग्दर्शक म्हणून विश्वास सोहोनी यांना याचं शंभर टक्के श्रेय द्यायला हवं.  
मानसी कुलकर्णी या विचक्षण प्रतिभेच्या अभिनेत्रीनं ‘घरबार’नंतर या नाटकातही आपल्या अभिनयाची प्रचंड रेंज दाखवून दिली आहे. शरीराच्या मागणीनं अभिसारिका बनलेली स्त्री आणि एका मुलाची आई यांच्यातलं जीवघेणं द्वंद्व त्यांनी विलक्षण समजदारीनं व्यक्त केलं आहे. मुद्राभिनयापासून अवघ्या देहबोलीतून त्यांचा हा संघर्ष जाणवतो. शशांक इंगळे या मुलाची अभिनयाची समजही वाखाणण्याजोगीच. आपल्या आईच्या अतक्र्य वागण्यामुळे स्तंभित झालेला, बालवयामुळे तिच्या भावना समजून घेऊ न शकणारा निरागस मुलगा त्याने उत्तमरीत्या साकारला आहे.
रवी-रसिक यांचं घराचं नेपथ्य, त्यात चार्ली चॅप्लिनच्या लहानग्यासोबतच्या निरागस फोटोचा केलेला चपखल वापर नाटकाच्या आशयात भर घालतो. स्वप्ननील जयकर यांच्या प्रकाशयोजनेनं आणि मयुरेश माडगांवकर यांच्या संगीतानं घरातलं आणि घराबाहेरचं जग समूर्त होतं.
एक नितांतसुंदर भावानुभव देणारा हा दीर्घाक बराच काळ प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत राहील यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 7:25 am

Web Title: mh 02 dl 5262
Next Stories
1 वाढता वाढता वाढे..
2 ऐश्वर्या.. अशीही
3 बॉलीवूड सेलेब्रिटींची ट्विटरमय होळी
Just Now!
X