05 March 2021

News Flash

मंगळ ‘सूत्र’

‘गळ्यामध्ये जरी तिच्या आहे मणीमंगळसूत्र, तरी आहे वेड मनी मंगळ स्वारीचं’ या कवितेच्या ओळी सध्या यूटय़ूब, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून प्रत्येकाच्या कौतुकाचा विषय झाल्या आहेत.

|| निलेश अडसूळ

‘गळ्यामध्ये जरी तिच्या आहे मणीमंगळसूत्र, तरी आहे वेड मनी मंगळ स्वारीचं’ या कवितेच्या ओळी सध्या यूटय़ूब, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून प्रत्येकाच्या कौतुकाचा विषय झाल्या आहेत. ‘मार्स ऑर्बिìटग मिशन’ म्हणजेच २०१३ साली भारताने केलेल्या मंगळ वारीत महिला वैज्ञानिकांचे असलेले योगदान ‘मिशन मंगल’ या चित्रपटातून समोर येणार आहे. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, नित्या मेनन, कीर्ती कुलहारी अशा दर्जेदार नायिकांचा आगळावेगळा अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. संसाराबरोबरच विज्ञानात विविध प्रयोग करू पाहणाऱ्या आणि  मंगळयान घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या त्या महिला वैज्ञानिकांना ही कथा समर्पित करण्यात आली आहे. विज्ञानावर वास्तववादी चित्रपट आपल्याकडे आलेला नाही, ‘मिशन मंगल’च्या निमित्ताने अशा विज्ञानकथेचा भाग होता आले, याचा आनंद वाटत असल्याचे अभिनेता अक्षय कुमार याने सांगितले.

मंगळयान मोहिमेतील प्रमुख वैज्ञानिक राकेश धवन आणि त्यांचे सहकारी तारा शिंदे, एका गांधी, कृतिका अग्रवाल, वर्षां गावडा, नेहा सिद्दीकी, परमेश्वर नायडू, अनंत आयर आदी वैज्ञानिकांना हा चित्रपट म्हणजे एक मानवंदना असल्याची भावना अक्षय कुमारने व्यक्त केली आहे. मंगळयान बनवणे हे भारतापुढील मोठे आव्हान होते. कारण हे यान घडवण्यासाठी लागणारा खर्च हा भारताला परवडण्यासारखा नव्हता. परंतु राकेश धवन आणि त्यांच्या धाडसी सहकाऱ्यांनी हे आव्हान पेलले आणि भारताची मंगळ स्वारी यशस्वी झाली. भारतच नव्हे तर संपूर्ण जगाने या घटनेची नोंद घेतली. आजवर वास्तविकतेवर आधारित अनेक सिनेमे झाले, परंतु वैज्ञानिकांच्या संघर्षांवर आपल्याकडे आजपर्यंत चित्रपट आला नव्हता. २०१३ साली घडलेली ती ऐतिहासिक घटना ‘मिशन मंगल’च्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे आणि म्हणूनच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येत असल्याचे अक्षयने सांगितले.

‘हा चित्रपट पूर्णत: विज्ञानावर आधारित आहे. आणि विज्ञान ही एक अशी बाब आहे. ज्याला कोणतीही जात नाही, धर्म नाही. विज्ञान सर्वासाठी आणि सर्व ठिकाणी एकच परिणाम लागू करते. आजवर विज्ञानावर वास्तववादी चित्रपट आला नाही. आणि असा चित्रपट  बॉलीवूडमध्ये येताना त्यात प्रमुख भूमिका माझी असणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. अभिनयाबरोबरच मी या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. ज्या वेळी मी फक्त अभिनय करत होतो तेव्हा अनेक नावीन्यपूर्ण आणि सामाजिक आशयाचे चित्रपट माझ्याकडे आले. परंतु आर्थिक अडचणींमुळे ते कायम मागे राहिले. याचकारणाने जेव्हा मी चित्रपट निर्मिती करण्याइतपत सक्षम झालो तेव्हापासून कायम वेगळे आणि लोकांना त्यातून काहीतरी संदेश देता येईल असेच चित्रपट मी करत आलो आहे’, असे अक्षय कुमारने सांगितले.

‘मिशन मंगल’च नव्हे तर यावेळी त्याने ‘पॅड मॅन’ चित्रपटाची आठवणही सांगितली. ‘पॅडमॅन’सारख्या चित्रपटाची कथा चार र्वष निर्मात्यांकडे भटकत होती परंतु जेव्हा ती माझ्या हातात आली तेव्हा आम्ही कोणताही विचार न करता त्यावर काम सुरू केले. आज ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि ‘पॅडमॅन’सारखे चित्रपट भारतातल्या गावागावांत दाखवले जातात याचा मला अभिमान आहे. आणि अशा चित्रपटांना सरकारचाही पाठिंबा असल्याने त्यांचेही आभार मानत असल्याचे अक्षयने यावेळी बोलताना सांगितले.

आपल्या देशातील सामान्य तरुण अजूनही विज्ञानाकडे वळलेला नाही. जगातील सर्वोत्तम वैज्ञानिक भारतने घडवले आहेत, असा भक्कम इतिहास असतानाही इथला तरुण विज्ञान आणि संशोधनाविषयी संकोच/न्यूनगंड बाळगताना दिसतो. त्याचबरोबर भारतातील मुलींना संशोधन आणि विज्ञान यापासून कायम परावृत्त केले जाते, याकडे लक्ष वेधून घेतानाच देशभरातील सर्व तरुण-तरुणींना विज्ञानाकडे वळण्याची प्रेरणा मिळावी यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली असल्याचे त्याने सांगितले. आपल्या भोवती असलेल्या सर्व परिसीमा ओलांडून विज्ञानाकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले तर भारतात अजून मोठी क्रांती होईल. आणि हा चित्रपट पाहून मुलांमध्ये बदल घडून आला तर मला माझा उद्देश सफल झाल्याचे समाधान मिळेल, असेही तो म्हणतो.

विज्ञानावर भर देणाऱ्या अक्षयला विज्ञानाची आवड होती का, यावर बोलताना तसा.  माझा विज्ञानाशी कधी जास्त परिचय आला नाही, परंतु लहान असताना मी वडिलांचा ट्रान्सिस्टर फोडून त्यातले लोहचुंबक काढले होते. तेव्हा लोकचुंबक हा प्रकार माझ्यासाठी नवीन होता. आणि घरात ट्रान्सिस्टर असणे ही त्या काळी खूप मोठी गोष्ट मानली जायची. मी ट्रान्सिस्टर फोडून त्यातल्या चुंबकासोबत खेळत बसलो. वडिलांना कौतुकाने मी केलेले संशोधन सांगायला गेलो आणि मार खावा लागला, असे भन्नाट संशोधन आपल्या हातून झाले असल्याची मिश्कील आठवणही त्याने सांगितली.

या चित्रपटात महिला वैज्ञानिकांवरही भर देण्यात आला आहे. त्याबद्दल बोलताना, हा चित्रपट करताना महिलांचे सामथ्र्य मला प्रकर्षांने जाणवले, असे तो म्हणतो. ‘इथे प्रत्येक गोष्टीत महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. याविषयी मी अनेकदा खंत व्यक्त केली आहे. पण आज कोणतेही क्षेत्र असे नाही जिथे महिला पोहोचलेल्या नाहीत. आणि या मिशनमध्ये असलेल्या महिला तर घरसंसार सांभाळून विज्ञानात आपले ध्येय शोधणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांचे कर्तृत्व पाहून महिलांविषयीचा आदर नक्कीच वाढेल. जगापेक्षा वेगळे तंत्रज्ञान वापरून घडवलेल्या मंगळयानात होम सायन्स म्हणजे गृह विज्ञानाचा मोठा आधार होता. आणि यान बनवण्याच्या प्रक्रियेत कशा पद्धतीने हे गृहविज्ञान लागू होऊ  शकते हे सांगणाऱ्या महिला होत्या, ही गोष्ट लोकांनी लक्षात घ्यायला हवी’, असेही तो ठासून सांगतो.

या चित्रपटात केवळ विज्ञानकथा नाही, तर नाटय़ आहे, विनोद आहे,  तुमच्या आमच्या घरातील गोष्टी आहेत. त्यामुळे विज्ञानासोबतच याला मनोरंजनाची जोड आहे, त्यामुळे प्रत्येकाला हा चित्रपट आवडेल यात शंका नाही, असे त्याने स्पष्ट केले. ‘या चित्रपटात माझी भूमिका काय, यापेक्षा मला काय मांडायचं आहे किंवा लोकांना काय देता येईल याचा मी जास्त विचार केला आहे. फक्त आजवर नायकाच्या भूमिकेत आपल्याला पुरुष कलाकारांना पाहायची सवय आहे. मग ती आजीने सांगितलेली कथा असो, इतिहास वा पुस्तकातला धडा असो, परंतु महिला नायक आहे आणि  तिने अमुक अमुक एक गोष्ट केली. आणि त्याचा जगाने आदर्श घेतला. अशा कथा फार कमी सांगितल्या जातात. आणि ती कथा सांगण्याचे काम हा चित्रपट करतो आहे, असे अक्षय सांगतो. आज हे चित्र बदलतं आहे यात शंका नाही. परंतु हे बदल शहरांसोबत गावागावांमध्येही व्हायला हवेत, असे तो म्हणतो. ‘आपल्या देशाचे संरक्षण आणि अर्थ सारखे जबाबदारीचे खाते एक महिला सांभाळते आहे. ही फक्त सुरुवात आहे. अजून खूप महिला पुढे येतील आणि अनेक महिलांच्या जीवनावर चित्रपट बनवले जातील, असेही तो विश्वासाने सांगतो.

‘मिशन मंगल’च्या प्रसिद्धीसाठी चित्रपटाच्या प्रोमोजचे डबिंग विविध भाषेत करून भारतातील सर्व भागांत हा चित्रपट पोहचवण्याचा मानस असल्याचेही अक्षयने सांगितले. त्यासाठी अगदी  सोप्या भाषेत  चित्रपटाची मांडणी केली आहे. शक्य तितके प्रादेशिक शब्द वापरून हा चित्रपट घडवला आहे. परंतु ज्या ठिकाणी इंग्रजीला पर्यायच नाही. किंवा त्या शब्दातील भाव भाषांतर केल्याने निघून जात असतील असे काही विज्ञानावर आधारित शब्द कायम ठेवले आहेत. पण शब्द कठीण असले तरी मांडणी सहज आहे त्यामुळे ते  समजून घेताना कोणालाही अडचण येणार नाही, असे स्पष्ट करतानाच ‘मिशन मंगल’ हा कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट असल्याचेही अक्षय कुमारने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 11:15 pm

Web Title: mission mangal mpg 94
Next Stories
1 मुक्या परिभाषेचा बोलका ‘बाबा’
2 रिमझिम..रिमझिम
3 भाषेतलं भिजणं..
Just Now!
X