‘होम स्वीट होम’, ‘पुष्पक विमान’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि आता ‘६६ सदाशिव’. लागोपाठ वैविध्यपूर्ण भूमिकांमधून अभिनेते मोहन जोशी प्रेक्षकांसमोर आले. अभिनेता किंवा कलाकार म्हणून जेव्हा कारकीर्द संपायला येते, त्याच वेळी अशा प्रकारच्या भूमिका आपल्या वाटय़ाला याव्यात, हा आनंददायी अनुभव आहे. माझ्यातील कलाकार यामुळे सुखावला असल्याने वेगवेगळ्या लेखकांनी, दिग्दर्शकांनी अशा आव्हानात्मक भूमिका आपल्यासाठी लिहाव्यात, असंच वाटत असल्याचं मोहन जोशी सांगतात.

गेली अनेक र्वष हिंदी-मराठी चित्रपटांमधून मोहन जोशी यांनी सातत्याने खलनायक, चरित्रनायकाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र आत्ताचा टप्पा हा सगळ्यात चांगला असल्याचं ते मान्य करतात. आता दिग्दर्शनात उतरलेली तरुण मंडळी प्रचंड हुशार आहेत. प्रत्येक दिग्दर्शक हा आपला दृष्टिकोन घेऊन येतो, कलाकार म्हणून आमच्याकडून त्यांच्या काहीएक अपेक्षा असतात. या अपेक्षांवर आपण खरे उतरतो आहोत, वेगळ्या भूमिका करायची, नवं काही आत्मसात करायची संधी या निमित्ताने मिळते आहे, याबद्दल समाधान वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘६६ सदाशिव’ या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत आहे. मुद्देसूद वाद घालण्याच्या ६६ व्या कलेत पारंगत असलेले पुणेरी व्यक्तिमत्त्व त्यांनी या चित्रपटात साकारले आहे. ‘मी जगभर फिरलोय, त्यामुळे पुणे आणि खास करून सदाशिव पेठ कुठे कुठे आणि कशासाठी प्रसिद्ध आहे हे मला चांगलं माहिती आहे. काही जण त्यावरून थट्टा करतात, तर काही जण सदाशिव पेठेला मानतातही. मुळात पुणे शहरात उत्तम साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, कलाकार आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत.. एकूणच या शहरात सगळं उत्तम आहे. त्यामुळे ६६ सदाशिव पेठ म्हटल्यानंतर माझ्याच मनात एक उत्सुकता होती, काय विषय आहे हा नेमका? वाद कसा करावा हे पुणेकराकडून शिकावं. यातल्या नायकाला लक्षात येतं की, आपल्याला उत्तम वाद घालता येतो. मग तो स्वत:ला ६६ व्या कलेचा उपासक आहे हे जाहीर करतो. एका सर्वसामान्य माणसाचा प्रवास यात मांडला आहे,’ असं मोहन जोशी सांगतात.

एक तर या चित्रपटाचा विषय आणि जाहिरात क्षेत्रात २०-२२ वर्षांचा अनुभव असलेल्या योगेश देशपांडे यांचे चोख दिग्दर्शन यामुळे या चित्रपटातील भूमिका महत्त्वाची वाटल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटात मी, वंदना गुप्ते, महेश मांजरेकर असे नवीन-जुने कलाकार एकत्र आले आहेत. आम्ही सगळे प्रस्थापित कलाकार चित्रपटात असल्याने हाही एक उत्तम अनुभव होता, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

त्या वयात आपल्याला अक्कल नव्हती, हे स्पष्ट होतं आहे. कारण दिग्दर्शनात उतरलेली ही मुलं खूप हुशार आहेत. सध्या ते ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतही काम करत आहेत. रंगभूमीवरही सक्रिय आहेत. कारकीर्दीच्या या टप्प्यावर चौफेर काम करायला मिळतं आहे, याबद्दल ते समाधान व्यक्त करतात.

चांगले चित्रपट आणि कलाकार-दिग्दर्शक यांना उत्तम आर्थिक यश मिळवून देणारे चांगले चित्रपट यात अजूनही समतोल साधणं गरजेचं आहे.   – मोहन जोशी