दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती. देशोदेशीच्या प्रेक्षकांवर भुरळ पाडण्यात यशस्वी झालेल्या या चित्रपटासाठी भव्य सेट, दाक्षिणात्य चित्रपटांमधील तगडी स्टारकास्ट पाहता विविधभाषी प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगलीच पसंती दिली होती. ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये कलाकारांच्या मानधनाचा आकडा चित्रपटाच्या संपूर्ण बजेटपेक्षा फारच कमी होता, असे चित्रपटाचे सह-निर्माते शोबू यार्लागद्दा म्हणाले. या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट पाहता जर का तुम्हाला वाटत असेल की, सर्वच अभिनेत्यांनी चांगलेच मानधन आकारले असेल आणि त्यांच्या मानधनाचा आकडाही तसाच वजनदार असेल तर, तसे नाहीये.

‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह साऊथ’च्या पहिल्या परिषदेमध्ये शोबू बोलत होते.’या (बाहुबली) चित्रपटातील कलाकारांच्या मानधनासाठी बजेटपैकी फार थोडाच भाग वापरण्यात आल्याचे सांगत शोबू यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी जास्त खर्च झाल्याचे स्पष्ट केले. ‘बाहुबली’ या चित्रपटाचे दोन्ही भाग जवळपास ४५० कोटी रुपये खर्ची करून बनविण्यात आले आहेत. याविषयी बोलताना शोभू म्हणाले की, ‘चित्रपटावर झालेला खर्च पाहता मी फारच आनंदित आहे की चित्रपटावर खर्च झालेले पैसे वाया गेले नाहीत. किंबहुना या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचा आकडाही फारच कमी आहे’.

दरम्यान, दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. बहुचर्चित ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे चित्रीकरण हैदराबादमध्ये केले गेले होते. कला दिग्दर्शक साबू सायरिल यांनी ‘बाहुबली २’ साठी नवीन साम्राज्य उभे केले होते. ‘बाहुबली २’ साठी बनलेल्या या नवीन साम्राज्याचे फोटोही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते. ‘बाहुबली २’ चा हा सेट बनवण्यासाठी सुमारे ३०० ते ५०० कामगार वापरण्यात आले होते. त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्याच भागासारखी भव्यता ‘बाहुबली २’द्वारेही अनुभवता येणार का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच लक्षात येणार आहे. ‘बाहुबली: द कन्क्लयुजन’ असे म्हणवला जाणारा हा चित्रपट ‘कटप्पा ने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी २८ एप्रिल २०१७ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.