दिलीप ठाकूर
पडद्यावरील ‘आईच्या भूमिकेइतकीच चित्रपटसृष्टीतील प्रत्यक्षातील आईची भूमिका उल्लेखनीय असल्याचे’ दिसेल. बीग बीची आई तेजी बच्चन यांचेच उदाहरण घ्या. त्यांची फार पूर्वी तात्कालिक पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्याशी असलेल्या कौटुंबिक मैत्रीतून इंदिराजीनी अमिताभसाठी नर्गिस दत्त याना शिफारस पत्र लिहिले. ते घेऊन अमिताभ कोलकात्याहून मुंबईच्या चित्रपटसृष्टीत आला. अनेक स्टार्सच्या बाबतीत विविध संदर्भात आईची साथ दिसते.

करिश्मा अर्थात ‘लोलो’ आणि करिना अर्थात ‘बेबो’ या कपूर खानदानातील तिसर्‍या पिढीतील युवती चित्रपटसृष्टीत आल्या त्यात त्यांची आई बबिता हिची भूमिका, दूरदृष्टी व निर्णयक्षमता हे गुण खूपच महत्त्वपूर्ण ठरले. आपल्या या दोन्ही कन्यांच्या रुपेरी पदार्पणाचे बबिताने उघडपणे घेतलेले निर्णय गाजले. फार पूर्वी आपणही अभिनेत्री असल्याचा व कपूर खानदानातील सून असल्याचा (रणधीर कपूरची पत्नी) तिने प्रत्यय देतानाच ‘आईची काळजी’ हा सर्वात मोठा गुणही दिसतोय .

लोलोचा पहिला चित्रपट खरं तर बॉबी देओलसोबतचा ‘बरसात’ होता. शेखर कपूर दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रगतीस वेळ लागतोय हे पाहून बबिताने लोलोला या चित्रपटातून बाहेर काढण्याचा निर्णय घेऊन तिला ‘प्रेम कैदी’ मिळवून दिला. ( शेखर कपूरने दिग्दर्शन सोडताच राजकुमार संतोषीकडे ‘बरसात’ आला.) काहीसे असेच बेबोच्याही पहिल्या चित्रपटाबाबत झाले. बेबोने हृतिक रोशनसोबत ‘कहो ना .. प्यार है’चे पहिले चित्रीकरण सत्र केले आणि आई बबिताच्या लक्षात आले की, राकेश रोशनच्या पुत्रापेक्षाही अमिताभ बच्चनच्या पुत्रासोबत बेबोचे रुपेरी पदार्पण शानदार होईल. तिने लगोलग निर्णय घेतलाही आणि ‘कहो ना…’मधून बेबोला बाहेर काढण्याचा निर्णय घेऊन जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘रिफ्यूजी’मध्ये अभिषेकची नायिका केली. अर्थात हे आपल्या दोन्ही मुलींच्या रुपेरी भवितव्याच्या काळजीतून एका अनुभवी अभिनेत्री आईने घेतलेले हे सकारात्मक निर्णय ठरले. त्या काळात याची बरीच चर्चाही रंगली.

हेमा मालिनीसोबत तिची आई जया चक्रवर्ती कायमच असत. त्या काळात हेमाच्या आईची सावली सोबत असूनही धर्मेंद्रला हेमाचा सहवास कसा बरे मिळवतो हा गॉसिप्स मॅगझिनचा कुतुहलाचा प्रश्न होता. जया चक्रवर्ती यांनी प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ‘ड्रीम गर्ल’ (नायक धर्मेंद्र), बासू चटर्जी दिग्दर्शित ‘रत्नदीप’ (नायक गिरीश कर्नाड) अशा काही चित्रपटांची निर्मितीही केलीय.

श्रीदेवीसोबत कायमच तिची आई दिसे. नवीन चित्रपटाच्या मुहूर्तापासूनच त्याचा प्रत्यय येई. विशेष म्हणजेच मुलाखतीबाबत श्रीदेवीला विचारावे तर ती ‘मम्मीसे पुछो’ म्हणायची. श्रीची आई आजारपणात अमेरिकेत उपचार घेत असताना बोनी कपूरने श्रीला भरपूर मानसिक आणि भावनिक आधार दिल्याने ते दोघे खूपच जवळ आले.

माधुरी दीक्षितसोबत ‘अबोध’पासूनच तिचे आई-बाबा कायमच असत. देश-विदेशात कोठेही शूटिंग असले तरी त्यांची तिला कायमच साथ दिसे. शिल्पा शेट्टी, ऐश्वर्य रायबद्दलही असेच म्हणता येईल. मराठीत वर्षा उसगावकरसोबत तिची आई असे. दोघी बऱ्याचदा कोंकणी भाषेत बोलणे स्वाभाविक होतेच. मराठी चित्रपटसृष्टीतील हे छान उदाहरण झाले. अशीच काही बोलकी उदाहरणे म्हणजे, प्रिया बर्डेचे बाबा अरुण कर्नाटकी दिग्दर्शक तर आई लता अरुण अभिनेत्री असल्याने प्रियाला या व्यवसायाशी लहानपणापासून ओळख. किशोरी शहाणेने ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’पासून चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकले तेच आई-बाबांचा हात धरुन. तर अमृता खानविलकर व तिची आई अशी जोडी मराठी चित्रपटाची पार्टी, इव्हेंट्स अशाही ठिकाणी हमखास दिसणार. अमृताच्या खणखणीत यशात आईची खूपच मोलाची साथ आहे. ‘अप्सरा गर्ल’ सोनाली कुलकर्णीची आई पंजाबी आहे. तिनेही मराठी चित्रपटसृष्टीची कार्यशैली समजून घेतल्याचे जाणवते. सई ताह्मणकरच्या घरी जायचा कधी योग आलाच तर तिची आई अतिशय जिव्हाळ्याने स्वागत करणार व सईबद्दल खूप आस्थेने बोलणार. मराठी चित्रपटसृष्टीत तसे पूर्वापार कौटुंबिक वातावरण. बदलत्या मराठी चित्रपटानुसार ते कितपत राहते ते पाह्यचे. आई या नात्यातील चित्रपटसृष्टीतील उदाहरणे विविधरंगी.

किमी काटकरची आई फार पूर्वी हिंदी चित्रपटात नायिका बनण्यास आली होती. पण ती जुनियर आर्टिस्ट म्हणून वाटचाल करु शकली. तिने आपले ‘अभिनेत्री’ बनण्याचे स्वप्न किमीला ‘स्टार’ बनवून पूर्ण केले. नम्रता व शिल्पा या शिरोडकर भगिनींच्या आईने फार पूर्वी मॉडेलिंग केलेय. त्या अनुभवातून तिने आपल्या दोन्ही मुलीना चांगले मार्गदर्शन केले, संस्कार दिले. नम्रताने मॉडेलिंगमध्ये भरपूर यश मिळवले. चित्रपटात आली तेव्हा ती पूर्ण तृप्त भावनेने आली होती.

चित्रपटसृष्टीत अशा पध्दतीने आईची भूमिका व भावना उपयुक्त ठरल्याचे दिसतेय. काही अभिनेत्री मात्र या चित्रपटसृष्टीपासून आपली आई झालेच तर संपूर्ण कुटुंबच दूर ठेवतात. हे चक्र फिरत राहते आणि आता पूर्वीच्या काही अभिनेत्री आपल्या मुलीला चित्रपटसृष्टीत आणतात आणि आता त्यांची आईची जबाबदारी सुरु होते. जान्हवी कपूर अशीच ‘धडक’व्दारे चित्रपटसृष्टीत आली पण तिचा हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच दुर्दैवाने तिची आई श्रीदेवीचे धक्कादायक दुःखद निधन झाले.