इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेल्या ‘मि. एक्स’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बच्चेकंपनीच्या आवडत्या ‘चाचा चौधरीं’ना पाचारण करण्यात आले आहे. उन्हाळ्याची सुट्टी साधून मुलांसाठी ‘मि. एक्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. अदृश्य होऊ शकणारा नायक ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. अनिल कपूरच्या ‘मि. इंडिया’ या चित्रपटानंतर इतक्या वर्षांनी अदृश्य नायकाची कथा सांगणारा चित्रपट येणार असल्याने त्याच्या प्रसिद्धीसाठी मुलांमध्येच लोकप्रिय असलेल्या ‘चाचा चौधरी’ या कॉमिक व्यक्तिरेखेचा वापर करण्यात येणार आहे.
‘मि. एक्स’ हा खऱ्या अर्थाने साय-फाय पट आहे, असे इम्रान हाश्मीने सांगितले. मात्र, या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना असलेला अदृश्य नायक हा लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच पाहायला आवडत असल्याने कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट अशीच त्याची ओळख निर्माण करण्यात येणार असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. याआधीही हिंदी चित्रपटांनी प्रसिद्धीसाठी कॉमिक व्यक्तिरेखांचा वापर के लेला आहे. अक्षय कुमारने ‘राऊडी राठोड’ या चित्रपटासाठी ‘चाचा चौधरी’चा उपयोग केला होता. ‘चाचा चौधरी’च्या एका प्रकरणात राऊडी राठोड त्यांच्या मदतीला धावला होता. आत्ताही चाचा चौधरींकडे आलेल्या नव्या प्रकरणात ‘मि. एक्स’ची अदृश्य व्हायची शक्ती त्यांना उपयोगी पडणार आहे. त्यामुळे चाचा चौधरी, साबू आणि मि. एक्स या तिकडीच्या पराक्रमाची गोष्ट बच्चेकंपनीला या चित्रपटाच्या निमित्ताने वाचायला मिळेल. ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ने हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. ‘फॉक्स’च्या मुख्य विपणन अधिकारी शिखा कपूर यांच्या मते ‘मि. एक्स’ ही खऱ्या अर्थाने मोठी व्यक्तिरेखा आहे. तो त्याच्या अदृश्य शक्तीचा वापर करून समाजात चाललेल्या चुकीच्या गोष्टींना सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रसंगी कायदा हातात घेऊन अन्याय्य गोष्टींना मोडीत काढणारा ‘मि. एक्स’ सगळ्यांना आवडेल अशी व्यक्तिरेखा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्याला त्याच्याचसारख्या चाचा चौधरी या प्रभावी कॉमिक नायकाची साथ मिळाली तर लोकांपर्यंत वेगळ्या पद्धतीने ‘मि. एक्स’ची कथा पोहोचेल यासाठी ‘डायमंड टुन्स’च्या मदतीने ही कॉमिक कथा तयार करण्यात आली असल्याचे शिखा कपूर यांनी सांगितले. इम्रान हाश्मीने ‘चाचा चौधरी आणि मि. एक्स’ ही कथा ‘चाचा चौधरी’चे निर्माते काटरुनिस्ट प्राण यांना समर्पित केली आहे. कॉमिक बुक्स आणि बॉलीवूडचा हा सलोखा गेल्या काही वर्षांमध्ये वाढतो आहे. मात्र, त्यासाठी तसे चित्रपट आणि नायक असणे गरजेचे असते. ‘क्रिश’च्या प्रसिद्धीसाठी स्वतंत्रपणे कॉमिक तयार करण्यात आले होते. ‘मि. एक्स’च्या निमित्ताने पहिल्यांदाच इम्रान हाश्मी आणि चित्रपटाचे निर्माते विशेष फिल्म्स यांनी कॉमिक विश्वात प्रवेश केला आहे.