१२ वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या मंचावरून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पंचरत्नांपैकी सगळ्यात लहान चिमुरडी म्हणजे मुग्धा वैशंपायन. आता मुग्धा जजच्या रूपात ‘सारेगमप’मध्ये दिसणार आहे. एक तपाच्या या काळामध्ये मुग्धानं बरंच काही आत्मसात केलं आहे. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच गायनातही ती पारंगत झाली आहे. पण मुग्धाने जेव्हा सारेगमपची ऑडिशन दिली तेव्हा तिच्या आई-वडिलांना ती पहिल्याच फेरीमध्ये एलिमिनेट होईल असे वाटले होते.

मुग्धाला ‘तू जेव्हा सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये सहभागी झालीस तो क्षण तुला आठवतोय का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने उत्तर देत, ‘चौथी इयत्तेत शिकत असताना सारेगमपच्या ऑडिशन्स सुरू झाल्याचं टीव्हीवर दाखवलं गेलं. माझ्या क्लास टीचर हळदवणेकर यांनी याबाबत बाबांना सांगितलं. आपण मुग्धाला तिथे घेऊन जाऊया असं त्या म्हणाल्या, पण मुग्धा फार छोटी असून, ती गाणं शिकलेली नसल्यानं स्पर्धेत सहभागी होण्याइतकी छान गात नसल्याचं आई-बाबांना वाटत होतं.’

आणखी वाचा : प्रेग्नंट नीना गुप्ता यांना सतीश कौशक यांनी केले होते प्रपोज

पुढे ती म्हणाली, ‘तिथे मुंबई-पुण्यातील मुलं असल्यानं मुग्धा नक्की एलिमीनेट होणार असं त्यांना वाटत होतं. यासाठी ते टाळत होते, पण क्लास टीचर खूपच मागे लागल्या होत्या. स्वत: मला घेऊन जायला तयार झाल्या. त्यामुळं आई-बाबांपुढे पर्याय नव्हता. मी एलिमिनेट होऊन एका दिवसात परतणार याची आई-बाबांना पक्की खात्री असल्यानं फक्त अंगावरच्या कपड्यांसह मुंबईला गेलो होतो. मुंबईत फायनल राऊंडसाठी मी सिलेक्ट झाले.’