एआयबी शो वादप्रकरणी अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरला तात्पुरता दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. याप्रकरणी दाखल झालेला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी दोघांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली असून हायकोर्टाने एफआयआर रद्द न करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ एप्रिल रोजी होणार आहे.

एआयबी रोस्ट या कार्यक्रमावरून २०१५ साली सुरू झालेले वादळ अद्याप शमलेले नाही. मुंबईत वरळीमधील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये डिसेंबर २०१४ मध्ये ‘एआयबी’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांनी अश्लील शेरेबाजी केल्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. तर मुंबईतील गिरगाव कोर्टाने मुंबई पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश फेब्रुवारी २०१५ मध्ये दिले होते.

PHOTOS : जेव्हा हॉकिंग आयुष्याबद्दल बोलतात…

दाखल झालेली तक्रार ही चुकीची असून त्यातून आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा दावा रणवीर आणि अर्जुनने याचिकेत केला आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमात अश्लील शेरेबाजी केली नसल्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

जस्टिस आर. एम. सावंत आणि जस्टिस सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. एआयबी प्रकरणात रणवीर-अर्जुनसोबतच प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांचीही नावे आहेत.