रणबीरविषयी मी व्यक्त करत असलेल्या प्रेमाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे दीपिका पदुकोण हिने सांगितले. माझ्या मते तुम्ही प्रेमाची नेमकी व्याख्या सांगू शकत नाही. आम्ही दोघेजण जेव्हा एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगतो तेव्हा त्याचा अर्थ चुकीचा अर्थ लावला जातो. आम्ही खूप वेगळ्या भावनेतून याकडे बघतो कारण, प्रेमाची केवळ एकच व्याख्या असू शकत नाही. प्रेम हे बहुपदरी नाते आहे आणि ते वेळेनुसार विकसित होत असते, असे दीपिकाने म्हटले. त्यामुळे मी जेव्हा रणबीरवर प्रेम करते असे म्हणते तेव्हा त्याचा केवळ एकच अर्थ असू शकत नाही. प्रामणिकपणा, आदर आणि एकमेकांचे संरक्षण करण्याच्या भावनेतून प्रेम निर्माण होऊ शकते, असे दीपिकाने प्रसारमाध्यमांना सांगितले. बॉलीवूडच्या आगामी ‘तमाशा’ या चित्रपटाच्या प्रमोशनाच्या निमित्ताने रणबीर आणि दीपिका मुंबईत एकत्र आले होते. यावेळी दोघांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दीपिका आणि मी आठ वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीतील प्रवासाला सुरूवात केली. या काळात आम्ही दोघांनीही स्वतंत्र ओळख बनविण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. लोकांना आमचे काम आवडावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. या सगळ्याचा आमच्या वैयक्तिक नात्यावर कोणताही परिणाम होत नाही. आम्हा दोघांची स्वतंत्र ओळख आहे आणि आम्हाला आमच्या वैयक्तिक इतिहासाचे प्रदर्शन करायचे नाही, असे यावेळी रणबीर कपूरने सांगितले.