अभिनेता वरुण धवन, मनीष पॉल आणि क्रिती सेनॉन या कलाकारांनंतर अभिनेत्री नीतू कपूर यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. त्यासोबतच त्या सेल्फ क्वारंटाइन असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं आहे.
नीतू कपूर आगामी ‘जुग जुग जियो’ या चित्रपटामध्ये व्यस्त होत्या. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच त्यांना करोनाची लागण झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र, आज त्यांनी स्वत: पोस्ट शेअर करत करोना झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
View this post on Instagram
“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी सेल्फ क्वारंटाइन झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेत असून स्वत:ची काळजी घेत आहे. माझ्या प्रती काळजी आणि प्रेम व्यक्त केल्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. मास्क वापरा,सुरक्षित अंतर बाळगा आणि काळजी घ्या”, अशी पोस्ट नीतू कपूर यांनी केली आहे.
दरम्यान, ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या माध्यमातून नीतू कपूर बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात वरुण धवन, कियारा आडवाणी, प्राजक्ता कोळी ही कलाकार मंडळीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.