दोन वर्षे कॅन्सरशी लढा दिल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी ३० एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. गेल्या दोन वर्षांचा काळ त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत कसोटीचा होता. या संपूर्ण परिस्थितीत अंबानी कुटुंबीयांनी त्यांची साथ दिली. याबद्दल नीतू कपूर यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित नीतू कपूर यांनी अंबानींचे आभार मानले व गेली दोन वर्षे ऋषी कपूर यांनी कॅन्सरशी कसा लढा दिला होता, याबद्दल सांगितलं.

नीतू कपूर यांची पोस्ट – 

गेल्या दोन वर्षांचा काळ हा आमच्यासाठी एक मोठा प्रवासच होता. काही चांगले दिवस असतात तर काही वाईट दिवससुद्धा असतात. भावभावनांनी ओथंबलेला हा काळ होता. मात्र हा प्रवास अंबानी कुटुंबीयांच्या मदतीशिवाय, प्रेमाशिवाय पूर्ण झालाच नसता. या कुटुंबासाठी मी फार कृतज्ञ आहे. गेल्या सात महिन्यांपासून ऋषीजींची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना जराही संकोचलेपणा वाटू नये यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या परीने काम केलं.

ऋषीजींना वैद्यकीय मदत असो किंवा मग स्वत: येऊन त्यांची भेट घेणे असो अंबानी कुटुंबाने खूप मदत केली. आम्ही घाबरलेलो असताना त्यांनी आमची साथ दिली. मुकेश भाई, नीता भाभी, आकाश, श्लोका, अनंत आणि इशा तुम्ही देवासारखे धावून आलात. तुमच्यासाठी असलेली कृतज्ञतेची भावना मी शब्दांत मांडू शकत नाही आणि ती मोजूही शकत नाही. आमच्या संपूर्ण परिवारातर्फे मी तुमचे खूप आभार मानते.

आणखी वाचा : डॉ. अश्विनी अमोल कोल्हे करोनाविरुद्ध उतरल्या रिंगणात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋषी कपूर यांचा ल्यूकेमिया (रक्ताचा कॅन्सर) झाला होता. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये उपचारसुद्धा घेतला होता. ११ महिने ११ दिवस तेथे उपचार घेऊन ते भारतात परतले होते. मात्र इथे आल्यानंतर त्यांनी पुन्हा तब्येत बिघडली होती. २९ एप्रिल रोजी संध्याकाळी त्यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ३० एप्रिल रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.