दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं. ६ डिसेंबर २०१२ साली दिल्लीतील चालत्या बसमध्ये झालेल्या या सामूहिक बलात्कारनं मानवतेला काळीमा फासला होता. या घटनेनं संपूर्ण देश पेटून उठला होता. या सत्य घटनेवर आधारित ‘दिल्ली क्राइम ’ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर मार्च महिन्यात प्रदर्शित होत आहे. सात भागांची ही वेबसीरिज असणार आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणानंतरच्या संपूर्ण तपासावर ही सीरिज आधारली आहे. या वेबसिरिजमध्ये अभिनेत्री शेफाली शहा महिला पोलिस अधिकारी वर्तिक चतुर्वेदीच्या भूमिकेत आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध एका महिला पोलिस अधिकाऱ्यानं कसा घेतला या संपूर्ण कथानकावर ‘दिल्ली क्राइम ’ आधारलेली आहे.
"Delhi Crime" — a seven-part series inspired by a notorious 2012 rape investigation by the Delhi Police that reverberated across India and the world, written and directed by @RichieMehta — will premiere March 22 on Netflix pic.twitter.com/sVdINGQvz5
— Netflix Queue (@netflixqueue) January 29, 2019
गेल्या सहा वर्षांपासून या वेबसीरिजसाठी संशोधन सुरू होतं. दिल्लीतल्या सहा ठिकाणी या वेबसीरिजचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. रिची मेहताची ही वेबसीरिज आहे. रिचीनं ‘अमाल’, ‘आय विल फॉलो यु डाऊन’, ‘सिद्धार्थ’ अशा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. २२ मार्चला ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.
गेल्याच वर्षी निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित ‘दिल्ली बस’ हा चित्रपट देखील आला होता. या घटनेवर आधारित लेस्ली उडविन यांचा ‘इंडियाज़ डॉटर’ हा माहितीपटही आला होता. यामुळे मोठा वाद भारतात निर्माण झाला होता. या माहितीपटाच्या प्रदर्शनावर भारतात बंदीही घालण्यात आली होती.