सुहास जोशी

हेरकथा म्हणजे सुरस कथानकाचा हमखास फॉर्म्युला. पण त्यातील सुरसपणा प्रेक्षकांपर्यंत तेवढय़ाच सुरसपणे पोहोचणे गरजेचे असते. अन्यथा केवळ करामतींचे दृक्श्राव्य सादरीकरण इतपतच त्याचे स्वरूप उरते. मग केवळ सुंदर ललना, उंची मद्य, छानछौकी गाडय़ा आणि तांत्रिक करामती कराव्या लागतात. पण खरी हेरकथा त्यापलीकडे असते आणि त्याला अनेक पदर असतात. हे सारे उलगडून दाखवण्याचा एक चांगला प्रयत्न म्हणजे नेटफ्लिक्सवरील ‘स्पाय’ ही मिनी वेबसीरिज.

महायुद्धानंतरच्या वीस-एक वर्षांतील ही सत्यकथा. इस्रायल आणि सिरियामधील संघर्षांवर ही कथा बेतलेली आहे. सिरियाकडून होत असणाऱ्या हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर इस्रायलकडून १८६० मध्ये तेथे हेर पाठवायचे ठरवतात. हेर म्हणून तेथील वातावरणाशी पूरक अशी पाश्र्वभूमी असलेली व्यक्ती निवडायची असते. एली कोहेन या कारकुनाची त्यासाठी निवड केली जाते. कारकुनाला तशी पाश्र्वभूमीदेखील असते. त्याला तातडीने सहा महिन्यांचे प्रशिक्षणदेखील दिले जाते. त्यानंतर तो व्यापारासाठी आधी युरोपात जातो आणि तेथून विविध मार्गानी तो सिरियामध्ये प्रवेश करतो. सिरियातच व्यापार करून सिरियाची भरभराट करण्याचा त्याचा मानस तो योग्य त्या माणसांपर्यंत पोहोचवतो. अर्थातच त्याला अनेक ठिकाणी शिरकाव मिळतो. त्यातून तो सिरियातील सरकार उलथवण्यातदेखील यशस्वी ठरतो. दुसरीकडे इस्रायलसाठी हवी ती माहिती पोहोचवण्यातदेखील यशस्वी होतो. पण हे असेच सर्व काळ चालत नाही आणि एकेदिवशी पकडला जातो.

एली कोहेन या हेराच्या सत्यकथेवर ही मालिका आधारित आहे, त्यामुळे काहीतरी उगाच सुरस दाखवायचं म्हणून केलेल्या करामती असे याचे स्वरूप नाही हा भाग येथे खूप महत्त्वाचा ठरतो. साधारण पाच वर्षांच्या कालावधीत हे सारे घडते. मुळातच मर्यादित कथानक आणि मर्यादित वेबसीरिज अशी रचना असल्यामुळे कथानक ताणण्याची गरज पडत नाही. जे काही कौशल्य पणाला लागते ते मांडणीत. अतिशय संयत अशा मांडणीमुळे सीरिज प्रभावी ठरते, पण त्याच वेळी अतिशय संथ लयीत सुरू असल्यामुळे त्यातील थरार काही प्रमाणात का होईना कमी होतोच.

सीरिजचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे केवळ हेरकथा इतपतच तिचे कथानक मर्यादित ठेवलेले नाही. किंबहुना त्याबरोबरच त्या हेराच्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतार मांडण्याचादेखील प्रयत्न यामध्ये झाला आहे. ही बाब अनेकदा अशा कथानकांमध्ये पूर्णपणे दुर्लक्षित राहते. लग्न झालेला हा हेर अचानक देश सोडून जातो, पण त्याच्या कामाच्या स्वरूपाबाबत कुटुंब अनभिज्ञ असते. त्याच्या पत्नीला मुलींबरोबर एकटय़ाने एकेक दिवस काढताना ज्या कष्टाला तोंड द्यावे लागते त्याची व्यवस्थित मांडणी हेरकथेच्या जोडीनेच या सीरिजमध्ये केली आहे. इतकेच नाही तर हेरखात्यातील त्याच्या वरिष्ठांचे मानसिक ताणतणावदेखील कथेत उमटतात.

तत्कालीन संपर्काची साधने, माहिती मिळवण्याचे मर्यादित स्रोत, युद्धाचीदेखील मर्यादित साधने असे सारेच अनेक पातळ्यांवर मर्यादित असताना घडणारी ही गोष्ट आहे. तत्कालीन परिस्थितीची आजच्या काळात सहजपणे कल्पनादेखील करता येणे कठीण आहे. पण ती योग्य पद्धतीने मांडल्यामुळे प्रेक्षकांना त्या काळाची जाणीव अगदी सहजपणे होते हे नक्की. कपडेपट, सेट या सर्वात एक सहजपणा दिसतो. त्यामुळे आपोआपच प्रेक्षकाला कथानकाशी समरस होणे शक्य होते. हे दिग्दर्शकाचे यश मान्य करावे लागेल.

अर्थात अनेक चांगले मुद्दे असले तरी बहुतांश कथानक हे एकाच व्यक्तीभोवती अधिक फिरत राहते. त्यामुळे काही प्रमाणात व्यक्तिपूजेचा सूर उमटतो. तो टाळण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता. त्याचबरोबर काही बाबी अगदी सहज घडतात, त्यातील थरार पुरेसा उलगडत नाही. अर्थात आजच्या सनसनाटीच्या काळात असा प्रयत्नदेखील एक चांगली बाब आहेच. त्यामुळे पाहायला काहीच हरकत नाही.

‘स्पाय’

ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स