आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री चारशेहून अधिक झाडे कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. वृक्षतोडीची माहिती समजताच विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमींनी आरेमध्ये धाव घेतली आणि आंदोलन करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियाद्वारे अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील संताप व्यक्त केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी ‘मेट्रो ३’ प्रकल्पाचे समर्थन करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि मराठमोळा अभिनेता सुमित राघवन यांच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शंकर महादेवन आणि सुमित राघवन यांना टोमणे मारण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने तर त्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला नसता तर आज अशी वेळ आली नसती असे देखील म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी बिग बींनी ‘वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत माझ्या एका मित्राने त्याच्या कारऐवजी मेट्रोचा पर्याय स्वीकारला. वेगवान, सोयीस्कर आणि कार्यक्षम मेट्रोने ते प्रभावित झाले. प्रदूषणासाठी उपाय.. अधिकाधिक झाडे लावा, मी माझ्या बागेत वृक्षारोपण केले आहे, तुम्ही केले का?,’ असे ट्विट करत मेट्रोला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. त्यावर त्यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर लोकांनी आंदोलन केले होते. बंगल्याबाहेर निदर्शने करत ‘आरे वाचवा’च्या घोषणा दिल्या होत्या.

आणखी वाचा : बॉलिवूड कलाकारांनी आरे कारशेडला केला विरोध

अक्षय कुमारने व्हिडीओ शेअर करत मेट्रो प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. ‘मेट्रोचा प्रवास खरच खूप सोपा आणि कमी वेळाचा आहे. मी २ तासांऐवजी २० मिनिटांमध्ये घाटकोपरवरुन वर्सोव्याला पोहोचलो. मी या प्रवासाचा आनंद घेत आहे. मला असं वाटत ही एकच वाहतूक सुविधा आहे ज्यावर पावसाचा आणि ट्रॅफिकचा परिणाम होत नाही’ असे अक्षय कुमारने व्हिडीओमध्ये म्हणत मेट्रोला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचे म्हटले जात होते. आता नेटकऱ्यांनी या कलाकारांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.