बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला वैतागून आत्महत्या केली असे काही कलाकारांचे मत आहे. या प्रकरणावर आता भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी त्यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरले आहे. तसेच ज्या मंडळींनी सुशांतला चित्रपटात काम करु दिले नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले निशिकांत दुबे?

“बॉलिवूड इंडस्ट्री घराणेशाहीमुळे पोखरली आहे. सुरुवातीला दाऊद इब्राहिम या गुंडाचा बॉलिवूडमध्ये हस्तक्षेप होता अन् अता काही श्रीमंत कुटुंबांचा आहे. ही घराणेशाही मोडायला हवी. उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश अशा उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या कलाकारांना माझी विनंती आहे की त्यांनी तिथेच एका सिनेसृष्टीची निर्मिती करावी. तसेच महाराष्ट्र सरकारने सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करावी. व ज्या मंडळींनी त्याला चित्रपटात काम करु दिले नाही. ज्यांनी त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रेरीत केलं. अशा सर्व लोकांवर कायदेशीर कारवाई करावी.” अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

सुशांतचा थक्क करणारा प्रवास

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.