बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या वादग्रस्त आयुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची ३०० कोटींच्या दिशेनं घोडदौड सुरू झाली आहे. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेकांनी हा चित्रपट म्हणजे संजय दत्तची प्रतिमा उंचावण्यासाठी केलेला प्रयत्न अशी टीकाही केली होती. हिरानी यांनी संजय दत्तच्या आयुष्यातील काही गोष्टींवर जाणीवपूर्वक पडदा टाकला आणि या चित्रपटातून संजूची एक चांगली प्रतिमानिर्मिती करण्याचा प्रयत्न केला असा आरोप काहींनी खुलेपणानं केला.

अखेर बऱ्याच दिवसांनी संजय दत्तनं यावर मौन सोडलं आहे. ‘एखादा व्यक्ती त्याच्या प्रतिमानिर्मितीसाठी २५ ते ३० कोटी का खर्च करेल? ही सर्वाधिक रक्कम आहे. त्यामुळे या आरोपात तथ्य नाही. राजकुमार हिरानीनं जे आहे ते सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामुळेच चित्रपटाला तुफान प्रतिसाद लाभला आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे हे सर्व काही सांगून जातात’ असं संजय दत्त एका मुलाखतीत म्हणाला.

‘राजकुमार हिरानी आणि त्यांच्यासारखे इतर दिग्दर्शक केवळ नफा कमावण्यासाठी असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणतात’ अशी टीका काही दिवसांपूर्वी पत्रकार बलजीत परमार यांनी केली होती. संजय दत्तने अवैध शस्त्र बाळगल्याचं प्रकरण सर्वप्रथम बलजीत यांनीच उजेडात आणलं होतं. तसेच हा चित्रपट याच कारणामुळे पाहण्यास बलजीत यांनी नकार दिला होता.

त्याआधी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही या चित्रपटावर काही प्रश्न उपस्थित केले होते. १२ मार्च १९९३ आधी मुंबई बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी अबू सालेम एका टेम्पोमधून हँडग्रेनेड्स आणि रायफल घेऊन संजय दत्तच्या घरी आला होता. पाच एके ५६ रायफल्स आणि सात हँडग्रेनेड्स काही दिवस त्याच्या घरी ठेवण्यात आले होते हे या चित्रपटात का दाखवण्यात आले नाही, असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला. बायोपिक म्हटल्यावर वास्तव गोष्टींचा उल्लेख असणं अपेक्षित असतं, मात्र सहानुभूती मिळवण्यासाठी गुन्ह्यांवर पडदा टाकला जाऊ शकत नाही किंवा त्याचं खापर प्रसारमाध्यमांवर फोडून चालत नाही, असा टोलाही त्यांनी दिग्दर्शकांना लगावला होता. त्यामुळे या चित्रपटावर अनेक मोठ्या लोकांकडून टीका झाल्यानंतर संजयनं प्रथमच मौन सोडलं. या चित्रपटासाठी संजयनं ९-१० कोटी रुपये आणि चित्रपटाच्या प्रॉफिटमधील काही भाग घेण्याची अट चित्रपट दिग्दर्शकांसमोर ठेवली होती.