नवी दिल्लीतील विज्ञाना भवनात आज ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. मात्र पुरस्कार वितरणाआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसल्याचं कळताच काही कलाकारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. कलाकारांनी माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार न स्वीकारण्याची भूमिका घेतली होती. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी यावर बोलताना मंत्र्याच्या हस्ते पुरस्कार घेणार नाही या कलाकारांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे.

‘राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळावा ही कलाकारांची भावना स्वाभाविक आहे. मात्र जर राष्ट्रपतींना शक्य नसेल तर तो कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती करता येईल. पण मंत्र्याच्या हस्ते हा पुरस्कार घेणार नाही या कलाकारांच्या भूमिकेशी सहमत नाही’, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कलाकारांना फटकारले.

नाना पाटेकर यांनीही कलाकारांच्या भूमिकेशी आपण सहमत नसल्याचं म्हटलं आहे. ‘मला तीन राष्ट्रपती पुरस्कार राष्ट्रपतींच्याच हस्ते मिळाले आहेत. जर राष्ट्रपती पुरस्कार त्यांच्याच हस्ते मिळाला नाही तर नाराज होणं स्वाभाविक आहे. मात्र स्मृती इराणी यांच्या हस्ते स्वीकारण्यात गैर नाही. त्यामुळं पुरस्काराची किंमत कमी होत नाही’, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद अनुपस्थित राहणार असल्यानेच विजेत्या कलाकारांनी पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर मराठी कलाकार प्रसाद ओक आणि मंदार देवस्थळी यांनी हा पुरस्कार अखेर स्विकारला. काही वेळानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुरस्कार वितरणासाठी उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओक आणि मंदार देवस्थळी यांनी या सावळ्या गोंधळाबाबत नाराजी व्यक्त केली होती. ‘भारतातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये या पुरस्काराचा समावेश असतो. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेतानाचा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा असतो. पण तोच क्षण जर डावलला जात असेल तर ही वागणूक अपमानास्पद आहे असं वाटतं,’ अशा शब्दांत प्रसाद ओकने संताप व्यक्त केला. तर आतापर्यंत जी प्रथा सुरू होती ती याच वर्षी अचानकपणे मोडण्याचं कारण काय असा प्रश्न मंदार देवस्थळीने उपस्थित केला होता.