बॉलिवूडचा दबंग सलमान खानला तुरुंगात पोहोचवल्यामुळे बिष्णोई समाज चर्चेत आला आहे. वन्यजीव, प्राणीमात्रांवर प्रेम करणारा समाज अशी बिष्णोई समाजाची ओळख आहे. मागच्या पाचशे वर्षांपासून या समाजाने वन्यजीव, प्राणीमात्रांची काळजी घेतली आहे. बिष्णोई समाज पश्चिम राजस्थानात प्राण्यांचे संरक्षण करण्याबरोबरच प्रेमाने त्यांचे पालनपोषण करत आला आहे.

वन्यजीवांची शिकार रोखण्यासाठी १९९५ साली या समाजाने बिष्णोई टायगर फोर्सची स्थापना केली. बिष्णोई समाजाने एकटया सलमानलाच तुरुंगापर्यंत पोहोचवलेले नाही, तर आतापर्यंत शिकारीची ४०० प्रकरणे समोर आणली आहेत. शिकारीच्या घटना रोखण्यासाठी आणि त्यासंबंधी गुन्हे दाखल करण्यामध्ये टायगर फोर्स आघाडीवर आहे.

पश्चिम राजस्थानात ही बिष्णाई टायगर फोर्स सर्वात जास्त सक्रिय आहे अशी माहिती टायगर फोर्सचे अध्यक्ष रामपाल भावाड (४४) यांनी दिली. गुन्हे दाखल केल्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने त्याची साक्ष फिरवू नये याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो. साक्षीदाराने शेवटपर्यंत त्याच्या भूमिकेवर ठाम राहावे यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो असे भावड यांनी सांगितले. वन्यजीवांचे संरक्षण करताना आतापर्यंत आम्ही वीस पेक्षा जास्त सहकाऱ्यांना गमावले आहे असे त्यांनी सांगितले. याच बिष्णाई टायगर फोर्सच्या सदस्यांनी सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टाबाहेर फटाके फोडून आनंद साजरा केला.