अहिराणी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतुने अजिंक्य फिल्म प्रॉडक्शनच्यावतीने निर्मिलेल्या ‘ओ.तुनी माय..!’ हा अहिराणी भाषेतील चित्रपट १२ डिसेंबरपासुन नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या बाबतची माहिती दिग्दर्शक दीपक शिवदे यांनी दिली. आजवर अहिराणी भाषेतील चित्रपट सीडीच्या माध्यमातून पुढे आले. या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे सॅटेलाईटच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा तो पहिलाच अहिराणी चित्रपट ठरला आहे. नाशिक, औरंगाबाद, जळगाव या ठिकाणी मल्टीप्लेक्समध्ये तो प्रदर्शित होत आहे.
चित्रपटात उत्तर महाराष्ट्रातील रंगकर्मीचा सहभाग आहे. भुसावळचे विनोद चव्हाण यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटात नंदुरबार, धुळे, जळगाव, मालेगाव, सटाणा, नाशिक, अहमदनगर येथील कलाकारांचा समावेश आहे. खान्देशातील एका गावातील सरपंच, त्याचे कटकारस्थान, त्याच्या कृत्याला कंटाळलेली गरीब जनता, याच गावातील कामचुकार तीन मुले आणि शहरात गेलेला त्याचा मित्र यांच्या भोवती चित्रपटाचे कथानक फिरते. मित्राच्या मामाला न्याय मिळवून देतांना सरपंचाशी दोन हात करण्याची त्या कामचुकार मुलांची तयारी, त्यात घडणारे गंमतीदार प्रसंग यावर चित्रपटाची आखणी करण्यात आली आहे. अमोल थोरात, गितांजली ठाकरे, सुभाष शिंदे, योगेश निकम, प्रवीण माळी, पियु पवार, संजय भदाणे, अनुराधा धोंगडे, रंजन खरोटे, अनिल मोरे, शिवाजी शेवाळे आदींनी विविध भूमिका साकारल्या आहेत. नाशिक येथील संगीतकार संजय गीते यांचे संगीत असून पाश्र्वसंगीत धनंजय व गोरखनाथ धुमाळ यांचे आहे. चित्रपटाचे संकलन नाशिक येथील सुमंत वैद्य यांच्या स्टुडिओत झाले आहे. गीत रचना झोडगे येथील कमलाकर देसले यांची तर नृत्य अनिल सुतार यांचे आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी शिवदे यांच्यासह पुणतांब्याच्या अमोल राज यांनी सांभाळली. अहिराणी भाषेचा गोडवा संपूर्ण महाराष्ट्रात पसरविणे हा या चित्रपटाचा उद्देश असल्याचे दिग्दर्शक शिवदे यांनी सांगितले. आजवर अहिराणी भाषेत अनेक चित्रपट आले. परंतु, ते सर्व सिडीच्या माध्यमातून पुढे आले. सॅटेलाईटद्वारे प्रदर्शित होणारा हा पहिलाच अहिराणी चित्रपट आहे. खांदेशातील मातीत आपण लहानाचे मोठे झालो. यामुळे खान्देशाचे आपण काही देणे लागतो हा ध्यास मनात घेऊन या चित्रपटाच्या निर्मितीचा योग आल्याचे त्यांनी सांगितले.