बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक अक्षय कुमार आहे. एका वर्षात अक्षयचे ४ ते ५ चित्रपट प्रदर्शित होतात. करोनामुळे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ठकलण्यात आल्या आहेत. अनेक निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांना करोनाचा फटका बसला आहे. मात्र अशातही अक्षयची कमाई जोरदार सुरू आहे. इतकंच नव्हे तर त्याने मानधनाची रक्कम वाढवल्याची चर्चा आहे.
अक्षयने त्याच्या मानधनाची रक्कम ९९ कोटी रूपयांवरून १०८ कोटी रूपये केली होती. आता अक्षयने २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या मानधनाची रक्कम वाढवत १३५ कोटी रूपये इतकी केली आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटने हे वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे, अक्षय त्याचा खास मित्र व निर्माता फिरोज नाडियादवाला याला मानधनात विशेष सूट देत असल्याची चर्चा आहे. फक्त फिरोजसोबत काम करताना अक्षय त्याचं मानधन कमी करतो असं म्हटलं जातं.
View this post on Instagram
अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्याचा ‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट मार्च २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षयने ‘बेल बॉटम’चे शूटिंग पूर्ण केले आहे. तर ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतु’, ‘मिशन लायन’, ‘रक्षाबंधन’ अक्षयचे असे अनेक चित्रपट येत्या दोन वर्षात प्रदर्शित होणार आहेत.