‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच या भन्नाट स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

‘पानी फाऊंडेशन’ने या स्पर्धेचा एक प्रोमो रिलीज केला आहे. काही दिवसांपूर्वी ‘तुफान आलंया..!’ हे गीत प्रदर्शित करण्यात आले होते. यावर्षी विदर्भ योद्धा, मराठवाडा वीर आणि पश्चिम महाराष्ट्राचे मावळे अशा तीन संघाचा समावेश असेल. येत्या ८ एप्रिलपासून सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ ला सुरुवात होणार आहे. या पर्वात महाराष्ट्राच्या ३० तालुक्यांमधून तब्बल २०२४ गावं सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा ८ एप्रिल ते २२ मेपर्यंत रंगणार आहे.

विदर्भ योद्धाचं प्रतिनिधीत्व अनिता दाते, भारत गणेशपुरे करत आहेत तर मराठवाडा वीर म्हणून प्रतीक्षा लोणकर आणि गिरीश कुलकर्णी मराठवाड्याचे धैर्य वाढवताना दिसतील. पश्चिम महाराष्ट्राचे सई ताम्हणकर आणि सुनील बर्वे मावळे तेवढीच ताकदीची लढत देताना दिसणार आहेत.

गेल्यावर्षीही या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. गेल्यावर्षी सुमारे ११६ गावं सहभागी झाली होती. गेल्या वर्षी ‘पानी फाऊंडेशन’ने महाराष्ट्रातल्या तीन तालुक्यांत ही स्पर्धा घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या वॉटर कप स्पर्धेत साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातले वेळू गावाने आपले नाव कोरले होते. तर दुसऱ्या क्रमांक साताऱ्याच्याच जायगाव आणि बीडच्या खापरटोन या दोन गावांना विभागून देण्यात आला होता. बीडच्या राडीतांडा आणि अमरावतीच्या वाठोडा या दोन गावांना तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला होता. त्यामुळे या वर्षी वॉटर कप स्पर्धेत कोणते गाव आपले नाव कोरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.