17 November 2019

News Flash

“हो, आहे मी पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा एजंट”; पाकिस्तानी अभिनेत्याची कबुली

"उघडपणे मी सांगतो की मी आयएसआयसाठी काम करतो"

हमजा अली अब्बासी

पाकिस्तानमधील एका लोकप्रिय अभिनेत्याने स्वत:ला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयचा ऐजंट असल्याचे म्हटले आहे. भारतामधील एका वत्तवाहिनीच्या वृत्तांकनावर संतापलेल्या या अभिनेत्याने ट्विटवरुन हे वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानमधील हमजा अली अब्बासी याने ट्विटवर एका वृत्तवाहिनीच्या वार्तांकनाचे फोटो शेअर करत एक वादग्रस्त ट्विट केले आहे. अब्बासी हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा निकटवर्तीय मानला जातो. भारताच्या स्वातंत्र्य दिनी अब्बासीने एक ट्विट केले होते. त्यात त्याने ‘एका भारतीय वृत्तवाहिनीने मी आयएसआयचा गुप्तहेर असल्याचा दावा केला आहे. हे चुकीचे आहे. मी गुप्तहेर नसून उघडपणे हे मान्य करतो की मी आयएसआयसाठी काम करतो. तसेच मीच नाही तर पाकिस्तानमधील सर्व २० कोटी लोक आयएसआयसाठी काम करतात,’ असे म्हटले आहे.

हमजाच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे. मागील वर्षी मार्चमध्ये झालेल्या पाकिस्तानमधील निवडणूक प्रचारादरम्यान हमजा इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ (पीटीआय) पक्षाच्या प्रचारसभांमध्ये दिसला होता. त्यानंतर तो आयएसआयसाठी काम करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

हमजा याने यापूर्वीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीर मुद्द्यावर वादग्रस्त ट्विट केले आहेत. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर हमासने पंतप्रधान मोदींना टॅग करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या विचारसरणीसंदर्भात अनेक ट्विट केले होते. खुद्द पाकिस्तानमध्येही पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी हमास याच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन एकदा त्याच्यावर बंदी आणली होती. इतकचं नाही तर पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मिडिया नियामक प्राधिकरणाने (पीईएमआरए) हमासचे वादग्रस्त व्यक्तीमत्व लक्षात घेता त्याला एका कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण्यापासून रोखले होते.

First Published on August 19, 2019 10:41 am

Web Title: pakistani actor hamza ali abbasi declared himself as isi agent on twitter scsg 91