‘मिर्झापूर २’ या वेब सीरिजविरोधात कारवाई करण्याची मागणी खासदार अनुप्रिया पटेल यांनी केली होती. त्यावर आता सीरिजमध्ये कालीन भैय्याची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मिर्झापूर २’ ही वेब सीरिज २३ ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली.

‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी म्हणाले, “मिर्झापूरच्या कथेतील प्रत्येक गोष्ट ही काल्पनिक असून त्याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा जागेशी काहीच संबंध नाही, अशी टीप सीरिजच्या सुरुवातीलाच येते. मी एक अभिनेता असून याव्यतिरिक्त अजून काही बोलू शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे मिर्झापूर सीरिजमध्ये जर गुन्हेगार आणि गुंड आहेत तर त्यात रमाकांत पंडितसारखा हिरोसुद्धा आहे, जो शहरासाठी चांगलं काम करतोय.”

आणखी वाचा : कालीन भैय्या ते गुड्डू पंडित.. खऱ्या आयुष्यात इतक्या संपत्तीचे मालक आहेत Mirzapur 2 चे कलाकार

खासदार अनुप्रिया पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत मिर्झापूरच्या सीरिजविषयी ट्विट केलं होतं. ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली मिर्झापूरचा विकास होतोय. मात्र मिर्झापूर नावाच्या वेब सीरिजमध्ये या जिल्ह्याची बदनामी केली जात आहे. या सीरिजच्या माध्यमातून जातीय तेढ पसरवली जातेय’, असा आरोप करत त्यांनी सीरिजविरोधात कारवाईची मागणी केली होती.