हिंदी चित्रपटांबरोबरच प्रादेशिक चित्रपटांची एक मोठी बाजारपेठ भारतात आहे. आपल्याकडचा एक मोठा प्रेक्षकवर्ग मिळवायचा असेल तर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांची निर्मिती करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘फँटम फिल्म्स’ने दोन दिग्गज निर्मिती संस्थांबरोबर हातमिळवणी केली आहे. आशियाई आणि अमेरिकी चित्रपट निर्मितीमधला दुवा असणारी ‘इव्हानो पिक्चर्स’ आणि हॉलिवूडच्या नावाजलेल्या हॉररपटांची निर्मिती करणारे ‘ब्लमहाऊस प्रॉडक्शन्स’ यांच्याबरोबर फँ टम फिल्म्सने करार केला असून पुढच्या पाच वर्षांत कमीत कमी दहा चित्रपटनिर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे.
‘फँटम फिल्म्स’ ही बॉलिवूडमधील चार दिग्दर्शकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली पहिली कंपनी आहे. अनुराग, ‘क्वीन’ फेम दिग्दर्शक विकास बहल, ‘लुटेरा’ फेम विक्रमादित्य मोटवणे आणि मधू मन्तेना यांच्या ‘फँ टम फिल्म्स’ने प्रादेशिक चित्रपटांबरोबरच बॉलिवूडमध्ये चांगल्या भयपटांची निर्मिती करण्यासाठी या दोन संस्थांबरोबर एकत्र येऊन करार केला आहे. यात इव्हानो पिक्चर्स चित्रपटांच्या निर्मितीसाठी अर्थपुरवठा करणार आहे. स्वत: अनुराग कश्यप यातील काही चित्रपटांचे दिग्दर्शन करणार असून चित्रपट वितरणाची जबाबदारी ‘ब्लमहाऊस प्रॉडक्शन’ने उचलली आहे.
‘ब्लमहाऊस प्रॉडक्शन’ने आत्तापर्यंत पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी, द पर्ज, सिनिस्टर सारख्या भयपटांची निर्मिती केली आहे. या भयपटांनी हॉलिवूडमध्ये चांगली कमाई केली आहे. त्यामुळे बॉलिवूम्डमध्ये अशाप्रकारच्या भयपटांच्या निर्मितीसाठी ब्लमहाऊसच्या तज्ञांची मदत घेण्याचा आपला मानस असल्याचे अनुरागने म्हटले आहे. भारतीय बाजारपेठेसाठी चांगल्या भयपटांची निर्मिती करण्यात फँ टम्स आणि इव्हॅनो या दोन्ही बॅनर्सची आपल्याला मोलाची मदत होणार आहे. त्याचबरोबर भयपटांची निर्मिती प्रादेशिक भाषांमधूनही व्हावी, यासाठी वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटकर्मीना तयार करणेही या करारामुळे सोपे होणार असल्याचे ब्लमहाऊस प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन ब्लम यांनी सांगितले. सध्या १० चित्रपटांच्या निर्मितीसाठी करार करण्यात आल्याची माहितीही ‘फँ टम फिल्म्स’च्या सूत्रांनी दिली.