जॉर्ज बर्नाड शॉ या प्रतिभावान लेखकाच्या अनेक कलाकृतींची आजवर वेगवेगळी यशस्वी माध्यमांतर झाली आहेत. त्यांच्या ‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. आता याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन लवकरच एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव बालकवींच्या गाजलेल्या फुलराणी या कवितेवरुन ठेवण्यात आलं आहे.

‘फुलराणी … अविस्मरणीय प्रेमकहाणी’ असं या आगामी चित्रपटाचं नाव असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘What’s up लग्न’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक विश्वास जोशी ‘फुलराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. अलिकडेच या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालं आहे.


फुलराणी या चित्रपटाच्या कथेचं लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकत निर्माण झाली आहे. परंतु, या चित्रपटात नेमक्या कोणत्या कवलाकारांची वर्णी लागणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
चित्रपटाच्या कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असली तरी प्रेमाचा अविस्मरणीय अविष्कार या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळेल, असं दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणाले.

दरम्यान,बालकवी यांच्या गाजलेल्या ‘फुलराणी’ या कवितेवरूनच या चित्रपटाचे शीर्षक घेण्यात आले आहे. २०२० च्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल असं सांगण्यात येत आहे.