‘बाहुबली’ या चित्रपटामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता प्रभास लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली असून बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण यामध्ये त्याच्यासोबत झळकणार आहे. प्रभासच्या करिअरमधला हा एकविसावा चित्रपट आहे. त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयीची माहिती दिली.
‘दीपिकासोबत काम करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत’, असं कॅप्शन प्रभासने दिलं आहे. या चित्रपटाचा विषय अत्यंत वेगळा असून त्यासाठी मोठा बजेट निर्मात्यांनी ठरवला आहे. नाग अश्विन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. याविषयी तो म्हणाला, “दीपिकाला ही भूमिका साकारताना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. कोणत्याही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने याआधी अशी भूमिका साकारली नव्हती. दीपिका आणि प्रभासची जोडी हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य असेल.”
याआधी प्रभास ‘साहो’ चित्रपटात झळकला होता. यामध्ये श्रद्धा कपूरने त्याच्यासोबत भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. याशिवाय प्रभासच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यामध्ये प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.