सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रशांत भूषण यांनी ट्विट करून सरन्यायाधीश शरद बोबडे व सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यामुळे त्यांना हा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान या प्रकरणावर अभिनेते प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक अनोखं कार्टून पोस्ट करत या प्रकरणावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे.

आणखी वाचा- सुप्रीम कोर्टाने १ रुपयाचा दंड ठोठावल्यानंतर प्रशांत भूषण यांचं ट्विट, म्हणाले…

“एक रुपया आदर राखण्यासाठी… नेमकं कोणी काय गमावलं?” अशा आशयाचं ट्विट करुन प्रकाश राज यांनी या प्रकरणावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते रोखठोक मतं मांडतात. या पार्श्वभूमीवर त्यांचं हे ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा- अवमान प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला प्रशांत भूषण देणार आव्हान, म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना १५ सप्टेंबरपर्यंत हा दंड भरण्यास सांगितला आहे. दंड न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास तसंच तीन वर्षांकरिता वकिली करण्यापासून रोखलं जाईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. न्यायालय अवमान प्रकरणी प्रशांत भूषण न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने शिक्षा सुनावली आहे.