बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने आपल्याला अभिनयाने हॉलीवूडलाही जिंकले आहे. ‘क्वांटिको’ मालिकेत काम केल्यानंतर प्रियांका आता ‘बेवॉच’ या हॉलीवूडपटात झळकणार आहे. यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीचे आयुष्य सर्वांसाठी खुल्या पुस्तकासारखे आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी सर्वांसमोर न घाबरता बोलते. तिच्यावरील झालेल्या टिप्पणीलाही ती सडेतोड उत्तर देते. पण, आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टपणे बोलणारी ही देसी गर्ल तिच्या ‘रिलेशनशिप्स’बाबत खूप खासगी आहे.
प्रियांका चोप्राने रेफिनरी२९ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्त्रीवादाची व्याप्ती, पुरूषांपासून दूरावली न गेलेच्या कारणांवर, खासगी आयुष्य आणि तिच्या जागतिक प्रतिमेविषयी विस्तृत चर्चा केली. प्रियांका म्हणाली की, पुरुषांना आम्हाला काही खडसवायचं नाहीये, त्यांचा जीव घ्यायचा नाहीये किंवा त्यांचा तिरस्कारही करायचा नाही हे स्त्रीवादामध्ये त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही फक्त आमच्यासोबत राहा इतकच आम्हाला हवं आहे. यावेळी तिला ‘रिलेशनशीप’बाबतही विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, माझं असं कोणीतरी असावं जेणेकरून मी स्वतःची काळजी घेईन. असं नाही की मी ‘रिलेशनशीप’मध्ये नव्हते. आतापर्यंत मी अनेकदा रिलेशनशीपमध्ये राहिले आहे. पण या क्षणाला मी अशा ठिकाणी आहे जिथे ते ‘कॉम्पलिकेट’ दिसतयं. धन्यवाद, फेसबुक.
आंतरराष्ट्रीय अभिनेत्री बनलेली प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक झाली आहे. इथूनच ती नव नवे आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्सही करते आहे. कामाच्या एवढ्या व्यस्त कारभारातून स्वतःसाठी वेळ काढायला मात्र ती विसरत नाही. आयुष्य मजा मस्ती करत जगण्यावर ती अधिक भर देते. अमेरिकेमध्ये सध्या न्यूयॉर्क फॅशन वीक सुरु आहे. या फॅशन वीकमध्ये अनेक नावाजलेले आंतरराष्ट्रीय कलाकार आपली हजेरी लावतात. फॅशन आयकॉन असलेल्या प्रियांकानेही या फॅशन वीकला हजेरी लावली होती. ‘क्वाटिंको २’ शिवाय प्रियांका ‘बेवॉच’ या चित्रपटामध्येही भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती हॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. यात अलेक्झांड्रा दद्दारिओ, इलफेनेश हॅडेरा आणि केली या अभिनेत्री तसेच ड्वेन जॉन्सन (रॉक), झॅक एफरॉन, जॉन बॅस हे कलाकारही झळकणार आहेत. इतकेच नाही तर प्रियांका आता मराठी चित्रपटसृष्टीतही पदार्पण करतेय. व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटाची निर्मिती ती करणार असून हिंदीतील दिग्दर्शक राजेश म्हापुसकर याचे दिग्दर्शन करणार आहेत.