ओपरा विन्फ्रेला दिलेल्या एका मुलाखतीमुळे प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल चांगलेच चर्चेत आले होते. या मुलाखतीमध्ये मेगन मर्केल यांनी अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. त्यानंतर त्यांना ट्रोलही व्हावं लागलं होतं. यानंतर आता या शोमध्ये लवकरच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हजेरी लावणार आहे.

ओपरा विन्फ्रे यांच्या ‘ओपरा विन्फ्रेस् टॉक शो सुपर सोल’ या शोमध्ये प्रियांका चोप्राची मुलाखत घेण्यात आली आहे. नुकताच डिस्कवरी प्लसच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यात ओपरा विन्फ्रे प्रियांकाला काही प्रश्न विचारत असल्याचं  दिसतंय.

या प्रोमोच्या सुरुवातील प्रियांका हसताना दिसतेय. मात्र शेवटी प्रियांकाचा गंभीर चेहरा दिसतोय. ओपरा विन्फ्रे यांनी प्रियांकाला “तु आणि नीकने कुटुंब वाढवण्याबाबत काय विचार केलाय?” असा प्रश्न केलाय. यात प्रियांकाचं उत्तर काय हे दाखवण्यात आलं नसलं तरी या प्रश्नावर प्रियांका काहीशी गंभीर झाली आणि विचारात पडल्याचं दिसतंय.

ओपरा विन्फ्रेला या प्रश्नावर प्रियांकाने काय उत्तर दिलं हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलंच. मात्र प्रियांकाच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव पाहून तिचे चाहते कोड्यात पडले आहेत. या प्रोमोमध्ये ओपरा विन्फ्रे म्हणतात की, “मला अशा लोकांना ऐकायला आवड जे मनापासून बोलतात आणि सगळ्यांना प्रेरित करतात. इतकच नाही तर त्याच्यादृष्टीने जीवनाला वेगळं महत्व आहे.” असं त्या म्हणाल्या.

प्रियांका चोप्राची ही मुलाखत 20 मार्चला प्रक्षेपित होणार आहे.