देशात करोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस करोना संक्रमणाची आणि मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. करोनाच्या विळख्यात सर्वसामान्य जनतेपासून कलाकारांपर्यत सगळे अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाबी चित्रपटसृष्टीतील सतीश कौल यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर आता पंजाबी अभिनेते आणि दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे निधन झाले. आज ५ मे रोजी सुखजिंदर यांनी युगांडामध्ये शेवटचा श्वास घेतला. सुखजिंदरचे असिस्टंट जगदेव सिंग यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

सुखजिंदर शेरा गेल्या महिन्यात १७ एप्रिल रोजी केनियाला त्यांच्या मित्राच्या घरी गेले होते. २५ एप्रिल रोजी तिथेच त्यांना कताप आला, त्यानंतर त्यांना न्यूमोनिया झाल्याचे समोर आले. बुधवारी पहाटे २च्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांचा मृत्यु झाला.

पंजाबी अभिनेता करमजित अनमोल यांनी सुखजिंदर यांना श्रद्धांजली देत एक फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सुखजिंद यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘यारी जट्ट दी’ आणि ‘जट्ट ते जमीन’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘यार बेली’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.