बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या निधनानंतर घराणेशाही वाद पेटून उठला. सुशांतच्या चाहत्यांनी बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहर, आलिया भट्ट, अनन्या पांडे, सोनम कपूर, सलमान खान, सोनाक्षी सिन्हा अशा अनेक स्टारकिड्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता चित्रपट निर्माते आर. बाल्की यांनी घराणेशाही या वादावर त्यांचे मत मांडत संताप व्यक्त केला आहे.

नुकताच त्यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘हे नाकारता येण्यासारखे नाही. हे सर्वत्र आहे. एकदा विचार करा अंबानी, बजाज, महिंद्रा यांच्या वडिलांनी त्यांचा बिझनेच त्यांच्या मुलांकडे सोपवला. मुकेश अंबानी हा बिझनेस सांभाळू शकत नाहीत, दुसरं कुणी तरी सांभाळायला हवा असा कोणी विचार केला का? समाजातील प्रत्येक स्थरांमध्ये हे होत असते. एखादा भाजी विकणारा व्यक्ती देखील त्याचा बिझनेस त्याच्या मुलांकडे सोपवतो. या विषयावर चर्चा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

पाहा : जेठालालवर भुरळ घालणाऱ्या बबिताचा चर्चेत असलेला ग्लॅमरस लूक पाहिलात का?

काही कलाकारांच्या बाबतीत घराणेशाही हा शब्द वापरणे चुकीचे आहे असे बाल्की यांनी म्हटले आहे. ‘स्टार किड्सला खरच मोठा फायदा असतो का? असा प्रश्न आहे. तर मी सांगेन हो. जितके फायदे आहेत तितके तोटे देखील आहेत. मला तुम्हा सर्वांना एक साधा सरळ प्रश्न विचारायचा आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या पेक्षा चांगले कलाकार मला शोधून दाखवला आणि मग आपण यावर बोलू. असे बोलून आपण त्यांच्यासारख्या अतिशय चांगल्या कलाकारांवर अन्याय करत आहेत’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

आलिया भट्टच्या अभिनयाचे कौतुक करण्याऐवजी लोकं तिला एका चित्रपट निर्मात्यांची मुलगी आहे म्हणून ट्रोल करत आहेत असे बाल्की यांनी पुढे म्हटले आहे.