‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या वेगळ्या आणि हलक्याफुलक्या स्वरुपाने आजवर अनेकांची दाद मिळवली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्यातही तारक मेहता….मधील काही खास व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष आवडीच्या आहे. त्यातीलच एक व्यक्तिरेखा म्हणजे ‘टप्पू’ची. पण, ‘तिपेंद्र गडा’ म्हणजेच सर्वांचा लाडका ‘टप्पू’ म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता भव्य गांधी याने मालिकेला रामराम ठोकल्याने त्याच्या चाहत्यांना फार वाईट वाटले होते. त्यानंतर आता ही भूमिका कोण साकारणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. दरम्यान, भव्य गांधीने मालिका सोडल्यानंतर निर्मात्यांना नवा टप्पू सापडला आहे.

भव्य गांधीने जवळपास गेली आठ वर्ष साकारलेली टप्पूची भूमिका आता अभिनेता राज अंधकट हा साकारणार आहे. एक रिश्ता साजेदारी का मालिकेत दिसलेला हा अभिनेता मोठ्या टप्पूची भूमिका साकारतना दिसेल. याविषयी राज म्हणाला की, मी ही मालिका पहिल्यापासून पाहत आलो आहे. टप्पूला लहानाचा मोठा होताना या मालिकेत पाहिलं आहे. टप्पूची भूमिका मजबूत आणि सकारात्मक आहे. असितजी  (मालिकेचे निर्माता) यांनी सदर भूमिका साकारण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवला यासाठी मी त्यांचा आभारी आहे. तसेच, आपल्यासाठी केवळ ही भूमिकाच मोठी असून दुस-या कोणत्याच गोष्टीचा मी विचार करत नाही, असेही त्याने म्हटले. लवकरच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये टप्पूचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याच दिवशी राज मालिकेत एण्ट्री करेल. त्याचे मित्र म्हणजेच टप्पू सेनाही त्याच्यासाठी पार्टीचे आयोजन करत आहे. प्रारंभिक गोंधळानंतर टप्पूचे वडील जेठालाल याने पार्टीचे बिल देण्याचे वचन दिले आहे.

bhavya-gandhi-raj-andhkat

दरम्यान, मालिकेच्या निर्मात्यांकडून आपल्याकडे सतत दुर्लक्ष झाल्यामुळे मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचे भव्यने स्पष्ट केले आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत भव्यने याबाबतचा खुलासा केला आहे. ‘मालिकेच्या निर्मात्यांना मी माझ्या भूमिकेबद्दल नेहमीच सांगत आलो होतो. पण, त्याबद्दल कोणताच सकारात्मक प्रतिसाद आपल्याला मिळाला नाही’, असे भव्यने सांगितले. ‘माझ्या भूमिकेला जास्त वाव नाही म्हणून मी ही मालिका सोडत आहे असे नाहीये तर, या व्यक्तिरेखेमध्ये फार क्षमता असूनही याकडे पाहिजे तेवढे महत्त्व दिले जात नव्हते. कुठेतरी हे पात्र वगळले जात होते. मी यासंबंधी नेहमीच मालिकेच्या निर्मात्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता’, असे भव्य म्हणाला.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे दोन हजार भाग आत्तापर्यंत प्रसारित झाले असून त्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्येही घेण्यात आली आहे. आत्तापर्यंत दीर्घकाळ चाललेली विनोदी मालिका म्हणूनही ‘तारक मेहता’ची नोंद गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली. दीर्घकाळ चालणारी ही मालिका आजही अमराठी कुटुंबांसह अनेक मराठी कुटुंबांमध्येही आवडीने पाहिली जाते.