सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार यांचा ‘रोबोट २.०’ हा बिग बजेट सिनेमा असल्याचे आपल्याला आधीच कळले आहे. मात्र, तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या सिनेमात वापरण्यात आलेली प्रत्येक गोष्ट ही भारतीय बनावटीची असल्याने हा खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ सिनेमा ठरणार आहे.

एखादा भव्य सिनेमा बनवताना त्यात तंत्रज्ञानापासून ते स्पेशल इफेक्टपर्यंत आणि लोकेशनपासून ते कलाकारांपर्यंत अनेक गोष्टींसाठी परदेशाची निवड केली जात होती. पण सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘रोबोट २.०’ हा सिनेमा यास अपवाद ठरणार आहे. या सिनेमातील तंत्रज्ञांपासून ते यात वापरण्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही भारतीय असणार आहे.

‘रोबोट’ सिनेमाचा सिक्वल असलेला ‘रोबोट २.०’ यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने थलाईवा रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. या सिनेमात अक्षय खलनायकाच्या भूमिकेत तर एमी जॅक्सनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/BOt_o-fgJP7/

दरम्यान, प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. शंकर यांचं दिग्दर्शन असलेल्या रोबो २.० चा टीझर अद्याप प्रदर्शित झालेला नाही. मात्र त्यापूर्वीच तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेतील सॅटेलाइट हक्क झी टेलिव्हिजनने ११० कोटींना विकत घेतले आहेत. सध्या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनवर काम सुरु आहे. काही दृश्यांचा अपवाद वगळता सिनेमाचे बहुतांश चित्रीकरण गेल्या वर्षी पार पडलं. पूर्णत: ‘मेक इन इंडिया’ असलेला हा सिनेमा चित्रपटगृहात कधी येतोय याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

https://www.instagram.com/p/BNCFOLjAu7H/

https://www.instagram.com/p/BNB8VaiAZXx/