काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करताना केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी बॉलिवूड भ्रष्टाचारमुक्त असल्याची पोच पावती दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड हे ४७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) समारोप सोहळ्य़ावेळी बोलत होते. बॉलिवूडमध्ये काळ्या पैशांचा वापर कमी झाल्याचे ते यावेळी म्हणाले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करताना बॉलिवूड काळ्या पैशाच्या दलदलीतून बाहेर आल्याचे म्हटले.

राठोड म्हणाले की, कॅशलेस पद्धतीमुळे दहशतवादासोबतच चोरीसारख्या प्रकारांना देखील आळा बसेल. चित्रपटसृष्टीमध्ये सुरुवातीपासून धनादेश आणि बँकेतून कर्जाद्वारे व्यवहार केले जातात. चित्रपटामध्ये काळ्या पैशाला थारा नाही असेही ते म्हणाले. पूर्वी पेक्षा सध्या बॉलिवूडमधील आर्थिक व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता आली असून त्यामुळेच चांगल्या चित्रपटांची निर्मिती होत असल्याचेही राठोड यांनी म्हटले आहे. काळ्या पैशाच्या माध्यमातून काही लोक देशात महागाई सारखी परिस्थिती निर्माण करतात. या प्रवृत्तीला कॅशलेश पद्धतीमुळे आळा बसेल. त्याचा फायदा सामान्य जनतेला होईल. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारावर भर दिल्यास दहशतवाद तसेच चोरी, अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी कमी करण्यास मदत होईल, असे राठोड यांनी म्हटले आहे.

२२ तारखेपासून  बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात रंगलेला इफ्फीचा समारोह सोमवारी पार पडला.  बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजमौली हे यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. युवा दिग्दर्शक-निर्मात्यांना इफ्फीचा सर्वाधिक लाभ झाला. सुभाष घई, नाना पाटेकर अशा दिग्गजांच्या उपस्थितीत समारोह सोहळा पार पडला. इराणच्या डॉक्टर या सिनेमाला या इफ्फीमधील उत्कृष्ट सिनेमासाठीचा सुवर्ण मयुर देऊन गौरविण्यात आले. दिग्दर्शन आणि निर्मितीसाठी चाळीस लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

भारतीय चित्रपट जगतात मानाचे स्थान मिळवलेल्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात २० नोव्हेंबरला झाली होती. यंदा या महोत्सवाचे ४६ वे वर्ष असून महोत्सवात सुबोध भावे दिग्दर्शित ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटासह चार मराठी चित्रपटांची निवड झाली होती. गेल्या वर्षी या महोत्सवात तब्बल ११ मराठी चित्रपट दाखवण्यात आले होते. यावर्षी चार मराठी चित्रपटांनी ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात स्थान मिळवत मराठी चित्रपटांचे महोत्सवातील सातत्य कायम राखले. गोव्यात झालेल्या या महोत्सवात इंडियन पॅनोरमा, आंतरराष्ट्रीय विभाग, भारतीय आणि विदेशी चित्रपटांचे सिंहावलोकन अशा विविध विभागांतर्गत देशविदेशातील चित्रपट दाखवण्यात आले. यात ‘इंडियन पॅनोरमा’ विभागांतर्गत चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ चित्रपटाबरोबर ‘कटय़ार काळजात घुसली’ या संगीत नाटकावर बेतलेला त्याच नावाचा चित्रपट, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेन्स’, सुहास भोसले दिग्दर्शित ‘कोती’ असे चार मराठी चित्रपट दाखवण्यात आले. मराठी चित्रपटांची या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील गेल्या काही वर्षांतील उपस्थिती लक्षणीय ठरली आहे.

कटप्पाने बाहुबलीला का मारले ? हे राज्यवर्धन राठोड यांना माहिती!