लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ९०च्या दशकातील रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका पुन्हा दाखवण्यात आली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले होते. ३३ वर्षानंतरही मालिकेची लोकप्रियता कायम असल्याचे पाहायला मिळाले. रामायण मालिकेनंतर उत्तर रामायण ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण काही दिवसांपूर्वीच मालिकेन प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता रामानंद सागर यांची श्री कृष्ण ही मालिका चाहत्यांसाठी पुन्हा प्रदर्शित करत आहेत. या मालिकेतील पात्र देखील पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
‘श्री कृष्ण’ या मालिकेत अभिनेते सर्वदमन डी बॅनर्जी यांनी श्री कृष्ण हे पात्र साकारले आहे. तर बलराम हे पात्र अभिनेते दिपक देऊळकर यांनी साकारले आहे. तसेच मालिकेतील महत्त्वाचे राधा हे पात्र अभिनेत्री रेश्मा मोदी यांनी साकारले आहे. पण रेश्मा या सध्या काय करतात हे जाणून घ्यायला सर्व चाहते उत्सुक आहेत.
श्री कृष्ण मालिकेनंतर रेश्मा यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये अभिनेत्री दीया मिर्झा, आर माधवन आणि सैफ अली खान यांचा ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटाचाही समावेश आहे. हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्यांनी ‘साढ़े सात फेरे’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री जूही चावलाने काम केले होते. या व्यतिरिक्त ‘चल चलें’, ‘फांस- एक जासूस की कहानी’ आणि ‘मिलता है चांस बाई चांस’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
श्री कृष्ण मालिकेत राधा हे बालपणीचे पात्र भूमिकाअभिनेत्री श्वेता रस्तोगीने निभावली होती. या मालिकेतील कृष्ण हे पात्र साकारणारे सर्वदमन हे सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत. ते सध्या ऋषिकेशमध्ये राहत आहेत. श्री कृष्ण ही मालिका १९९३ साली प्रदर्शित झाली होती. आता लॉकडाउनमुळे पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रामायण मालिकेच्या वेळात म्हणजे दररोज रात्री ९ वाजता ही मालिका दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित होत आहे. तसेच प्रेक्षकांनी आवडत असल्याचे दिसत आहे.