रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्यांच्या आगामी ‘गालिब’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला. या चित्रपटात त्या २००१ मध्ये भारतीय संसदेवर करण्यात आलेल्या दहशवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरूच्या पत्नीची भूमिका साकारत आहेत. अफजल गुरुचा मुलगा गालिबच्या संघर्षावर हा चित्रपट आधारित आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे’, असं म्हणत दीपिका यांनी ट्विटरवर ट्रेलरचा व्हिडीओ शेअर केला. ‘गालिब’ या चित्रपटाचे निर्मिती घनश्याम पटेल करत असून मनोज गिरी याचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात अभिनेते मिर सरवार हे अफजल गुरूची भूमिका साकारत आहेत. तर नवोदित अभिनेता निखिल पितळे यात गालिबच्या भूमिकेत आहे. दीपिका यांच्यासोबतच चित्रपटात अनिल रस्तोगी, अजय आर्या, मेघा जोशी आणि विशाल दुबे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. भद्रवाह आणि प्रयागराज या ठिकाणी चित्रपटाचं शूटिंग पार पडलंय.

२०१६ मध्ये अफजल गुरुचा मुलगा गालिब चर्चेत होता, कारण जम्मू-काश्मीरमध्ये दहावीच्या परीक्षेत सर्वोत्कृष्ट गुण त्याला मिळाले होते. जम्मू-काश्मीर बोर्डात त्याने १९वं स्थान पटकावलं होतं. बारावीत ८८ टक्के गुण मिळवल्यानंतर गालिबला आयएएस ऑफिसर व्हायचं होतं.

दीपिका चिखलिया यांनी आयुषमान खुरानाच्या ‘बाला’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. तर लॉकडाउनदरम्यान ‘सरोजिनी’ या चित्रपटातील भूमिकेची ऑफरही त्यांना मिळाली. सरोजिनी नायडू यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे.