बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. त्यानंतर अनेक कलाकारांनी ट्विट करत बिग बींसाठी प्रार्थना केली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील व्हिडीओ शेअर करत अमिताभ बच्चन लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली आहे.

रामदास आठवले यांनी ट्विटरवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ शेअर करत ‘हिंदी सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय करोनावर मात करुन लवरकच ठणठणीत बरे होऊ देत! त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून मी प्रार्थना करतो’ असे त्यांनी म्हटले आहे.

पहिल्या व्हिडीओमध्ये त्यांनी अमिताभ यांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे आपल्या सर्वांना चिंता वाटत आहे. त्यांची या देशाला गरज आहे. त्यामुळे त्यांनी लवकर बरे व्हावे आणि नानावटी रुग्णालयातून घरी यावे म्हणून प्रार्थना करतो असे म्हटले आहे.

आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे महानायक अमिताभ बच्चन यांना करोना झाल्याचे कळल्यावर मला धक्का बसला. गेली कित्येक वर्षे त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच आपल्या अभिनयाने अनेकांचे मनोरंजन करणारे अमिताभ बच्चन यांना करोना झाल्याचे कळताच मला धक्का बसला असे त्यांनी दुसऱ्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच अभिषेकने ट्विट करत पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले. ऐश्वर्या आणि आराध्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. “त्या घरीच होम क्वारंटाइनमध्ये राहणार आहेत. मुंबई महापालिकेने सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली असून ते आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत” असे अभिषेक बच्चनने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. माझी आई जया बच्चन आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचेही अभिषेकने सांगितले.