बॉलीवूड अभिनेता संजय दत्त लवकरच पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजाने लवकरच चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे. या चित्रपटासाठी त्याने संजय दत्तला साइन केल्याचेही सांगितले. पण, अद्यापपर्यंत या बातमीला संजूबाबाने दुजोरा दिलेला नाही. तसेच, याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, अशी माहिती लाइव्ह हिंदुस्तान संकेतस्थळाने दिली आहे.

रमीझ राजाने पकिस्तानी प्रसार माध्यमांसमोर सदर बातमीची घोषणा केली. सदर घोषणा करताना आपला हा चित्रपट क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे सांगितले. या चित्रपटात क्रिकेटच्या माध्यमातून दहशतवादाचा नायनाट केल्याचे दाखविण्यात येईल, असेही तो म्हणाला. रमीझ राजाने १९९२ साली इमरान खानच्या कर्णधार पदाखाली वर्ल्ड कप खेळला होता. त्यावेळी या संघाने वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले होते. दरम्यान, या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ किंवा पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान मुख्य भूमिकेत दिसण्याचीही शक्यता असल्याचे म्हटले जातेय.

आता संजय दत्तच्या आयुष्यावरही चित्रपट बनत आहे. यात बॉलीवूडचा हॅण्डसम हंक रणबीर कपूर हा संजूबाबाची भूमिका साकारत आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार हिराणी करत असून याची निर्मिती संजय दत्त प्रॉडक्शन, विधू विनोद चोप्रा हे संयुक्तपणे करणार आहेत. या चित्रपटासाठी रणबीर बरेच कष्ट करत असून त्याने याकरिता १५ किलो वजन वाढविल्याचेही म्हटले जातेय. याव्यतिरीक्त आणखी एका चरित्रपटामध्ये रणबीर दिसण्याची शक्यता आहे. बॉलीवूड दिग्दर्शक शूजीत सिरकार हा ‘पिंक’ चित्रपटानंतर बराच चर्चेत आला आहे. लैगिक अत्याचार यासारखा महत्त्वाचा विषय हाताळल्यानंतर तो आता आणखी एका चांगल्या विषयावर चित्रपट बनविण्याच्या तयारीत आहे. त्याचा पुढचा चित्रपट हा उधम सिंग यांच्या आयुष्यावर असणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. उधम सिंगच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसण्याची शक्यता आहे. उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नाव आहे. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या उधम यांनी त्यावेळी मायकल अॅडवायरची हत्या केली होती. १९१९ साली जालियनवाला बाग येथे भरलेल्या शांतता सभेत गोळीबार करण्याचे आदेश त्यावेळी मायकर अॅडवायरने दिले होते. भारतीय इतिहासातील ही एक वाईट घटना होती. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत शूजीत सिरकारने उधम सिंगच्या कार्याला लोक विसरले असल्याचे म्हटले. शूजीत म्हणाला की, स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख व्यक्तिंपैकी उधम हे एक होते. पण, आजच्या तरुणाईत फार कमी जणांना या हुतात्म्याविषयी माहित आहे. या नायकाला लोक विसरले आहेत. आजच्या तरुणाईला माझ्या चित्रपटातून त्यांच्याबद्दल मला सांगायचे आहे.