दूरदर्शन वाहिनीने लॉकडाउनच्या काळात लोकांच्या मनोरंजनासाठी जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली आहे. या यादीमध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या ‘सर्कस’ या मालिकेचा देखील समावेश आहे. या मालिकेत शाहरुखसह अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आता ३० वर्षांनंतर रेणुकानी मालिकेबाबत एक खुलासा केला आहे.

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेणुका शहाणे यांनी शाहरुख त्यावेळी अतिशय लोकप्रिय अभिनेता असल्याचे सांगितले. शाहरुखची ‘फौजी’ ही मालिका त्यावेळी प्रचंड लोकप्रिय होती. अनेक चाहते त्याला भेटण्यासाठी सेटच्या बाहेर वाट पाहायचे. ‘तो काळ मस्त होता. शाहरुख खानसाठी अनेक जण दीवाने होते. कारण त्यावेळी त्याची फौजी ही मालिक हीट झाली होती. त्यावेळी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी लोकांची रांग लागायची’ असे रेणुका शाहाणे यांनी म्हटले.

‘त्यावेळी शाहरुख मोठा फिल्मस्टार नव्हता. तरी देखील त्याला मी २० हजार लोकांनी घेरलेले पाहिले होते. लोकं फक्त शाहरुखला पाहायला यायचे. शाहरुख देखील त्याच्या कामात स्वत:ला वाहून घ्यायचा. तो सलग ३६ तास ब्रेक न घेता काम करायचा. आम्ही देखिल त्याच्यासोबत काम करण्यासाठी उत्साही असायचो’ असा खुलासा रेणुका शहाणे यांनी केला आहे.

सर्कस ही मालिका शनिवारी संध्याकाळी आठ वाजता दूरदर्शन वाहिनीवर पुन्हा प्रदर्शित होत आहे. करोना व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ९०च्या दशकातील अनेक हिट आणि आयकॉनिक मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. ‘महाभारत’, ‘रामायण’, ‘शक्तिमान’, ‘सर्कस’, ‘ब्योमन बाक्षी’, ‘देख भाई देख’ अशा अनेक मालिकांचा समावेश आहे.