निवडणुकीचे वारे जोरदार वाह्तायेत. जिंकण्याच्या इर्षेने प्रत्येक जण आश्वासनांची बरसात करताहेत.  याच पार्श्वभूमीवर ‘आता होऊ दया खर्च’ असं म्हणत गायिका रेश्मा सोनावणे नेत्यांना त्यांच्या कामाची आठवण करून देणार आहे. आगामी ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ या चित्रपटात गायिका रेश्मा सोनावणेने ‘आता होऊ दया खर्च’ हे ठसकेदार गाणे गायले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या वर्मावर बोट ठेवणारे हे ठसकेदार गाणे अरविंद जगताप यांनी लिहिले असून शशांक पोवार यांनी या गाण्याला  संगीत दिले आहे. या गाण्यातून नेत्यांची कानउघडणी गमतीशीरपणे करण्यात आली आहे.
‘सिद्धिविनायक इंटरनॅशनल फिल्म्स’ निर्मिती संस्थेचे निर्माते नविन सिंग आणि राकेश भोसले यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची तर दिग्दर्शनाची धुरा बाळकृष्ण शिंदे यांनी सांभाळली आहे. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वल निवडणुकीच्या रणधुमाळीत धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. नारायण वाघ आणि विश्वासराव टोपे या नेत्यांच्या पारंपारिक राजकीय शत्रुत्वाची कथा ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ या चित्रपटातून रंगणार आहे. सध्याच्या राजकारणाचं खुमासदार चित्रण आगामी ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ द्वारे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.