सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष पथकाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीची शनिवारी, सलग दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू ठेवली. जिवाला धोका असल्याने सुरक्षा पुरवा, या विनंतीमुळे रियाचा घर ते सीबीआय कार्यालयापर्यंतचा प्रवास पोलीस बंदोबस्तात झाला.

शुक्रवारी दहा तास चौकशी केल्यानंतर सीबीआय पथकाने रियाला शनिवारीही बोलावले. सांताक्रूझयेथील डिफे न्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) विश्रामगृह सुशांत प्रकरणाच्या तपासाचे केंद्र आहे. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास रिया तेथे पोहोचली. यावेळी तिचा भाऊ शोविकही उपस्थित होता.

सुशांतप्रकरणी सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रिया आणि शोविक संशयित आरोपी असून त्यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्थिक अफरातफरीचे आरोप आहेत. मुंबई पोलिसांची चौकशी, बिहार पोलिसांच्या तपासासह सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, आचारी नीरज सिंह, नोकर दीपेश सावंत, भाऊ शोविक यांच्या चौकशीतून पुढे आलेल्या तपशिलांच्या आधारे रियाकडे चौकशी सुरू असल्याचे समजते. सुशांतप्रकरणी ईडी, सीबीआयसह तीन यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

मुंबईचे पथक करोनाबाधित

सुशांत प्रकरणाची चौकशी करणाऱ्या वांद्रे पोलीस ठाण्याच्या पथकातील काही अधिकारी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेले काही वरिष्ठ अधिकारीही बाधित झाले, तर काहींना गृहअलगीकरणाची सूचना करण्यात आली.  यापैकी दोन अधिकाऱ्यांना सीबीआयच्या विशेष पथकाने चौकशीसाठी बोलावले होते.