हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून गांधी परिवारावर निशाणा साधला. देशातील प्रत्येक प्रकल्पाला गांधी परिवाराचेच नाव का, असा प्रश्न त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला. मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे नामकरण लता मंगेशकर किंवा जेआरडी टाटा सेतू मार्ग या नावाने करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. समाजासाठी ज्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांची नावे देशातील वेगवेगळ्या प्रकल्पांना दिली पाहिजेत. प्रत्येक वास्तूला गांधी परिवारातील नेत्यांची नावेच का? मला तरी हे पटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.


फिल्म सिटीचे नामकरणही दिलीप कुमार, देव आनंद, अशोक कुमार, अमिताभ बच्चन या दिग्गज कलाकारांपैकी एकाच्या नावाने करण्यात यावे, अशी मागणी करीत राजीव गांधी उद्योग काय असतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ असेच नाव का, असे म्हणत महात्मा गांधी, भगत सिंग, बाबासाहेब आंबेडकर यांची नावे का नाहीत. अगदीच वेगळे म्हणून माझे नाव द्यायला काय हरकत आहे, असे ऋषी कपूर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.