अभिनेता-निर्माता रितेश देशमुखचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘हमशकल्स’ आणि अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘एक व्हिलन हे एका मागोमाग एक प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहेत. यामागे कोणतीही योजना नसून, हा केवळ योगायोग असल्याचे रितेशचे म्हणणे आहे. विनोदी चित्रपट ‘हमशकल्स’ आणि ‘एक व्हिलन’ या थरारपटातून रितेशने दोन भिन्न टोकाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ‘हमशकल्स’मध्ये तो विनोदी भूमिका करताना नजरेस पडतो, तर ‘एक व्हिलन’मध्ये त्याने एका सिरियल किलरची व्यक्तिरेखा साकारली आहे. २० जून रोजी प्रदर्शित झालेल्या साजिद खानच्या ‘हमशकल्स’ चित्रपटाने ५५ कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे, तर शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या मोहित सुरीच्या ‘एक व्हिलन’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी १६ कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला. चित्रपटांबाबत आपण केलेल्या निवडीला श्रेय देत रितेश म्हणाला, माझ्यासाठी हे वर्ष कमालीचे यशदायक असून, तक्रार करण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही. विनोदी भूमिकांमधून बाहेर पडून काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेने मी हे चित्रपट करण्याचे ठरवले. सर्व चित्रपट एका पाठोपाठ प्रदर्शित होत असले, तरी तशी काही योजना नव्हती. माझ्या प्रयत्नांना प्रेक्षकांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे. खरचं, माझ्यासाठी हे आनंददायी आहे. ‘एक व्हिलन’ चित्रपटाविषयी बोलताना रितेश म्हणाला, चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील प्रगती पाहून आम्हाला आनंद होत आहे. असे असले तरी, या यशाचे सेलिब्रेशन इतक्यात करणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. लवकरच रितेशचा ‘लय भारी’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. ११ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रितेशबरोबर राधिका आपटे काम करत आहे. राधिकाविषयी बोलताना रितेश म्हणाला, राधिका एक हुशार अभिनेत्री आहे. 
चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेबाबत आणि भूमिकेविषयी ती कमालीची जागरूक असते. ज्या सहजतेने ती व्यक्तिरेखा साकारते ते वाखाणण्या जोगे आहे. सध्या रितेश ‘लय भारी’ चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमात व्यस्त आहे. रितेशची पत्नी जेनेलिया ‘लय भारी’ चित्रपटाची निर्माती असून, निशिकांत कामतने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रितेश देशमुख आणि राधिका आपटेबरोबर या चित्रपटात शरद केळकर आणि अदिती पोहनकर यांच्यासुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत. यशस्वी ‘हमशकल्स’, प्रथमच प्रयत्नात प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळवणारी ‘एक व्हिलन’ चित्रपटातील वेगळ्या धाटणीची खलनायकी भूमिका आणि येऊ घातलेला ‘लय भारी’ हा पहिला मराठी चित्रपट… हे पाहिल्यावर एव्हढेच म्हणावेसे वाटते, ‘लय भारी’ रितेश!