News Flash

‘रुद्रम’ ग्राफिकल मालिका स्वरुपात

‘झी युवा’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘रुद्रम’ या मालिकेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

मराठी मालिको पहिल्यांदाच चित्रकथा रूपात प्रकाशित

नवऱ्याच्या हत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणारी, आपल्या पद्धतीने न्याय मिळविण्यासाठी झगडणारी नायिका म्हणून ‘रागिणी’ हे नाव सध्या घराघरात लोकप्रिय ठरले आहे. ‘झी युवा’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘रुद्रम’ या मालिकेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता ही मालिका टीव्हीबरोबरच डिजिटल ग्राफिक सीरिज स्वरूपातही प्रेक्षकांसमोर आली असून ही चित्रकथा पुस्तकरूपात प्रकाशित करण्याचा वाहिनीचा मानस असल्याचे ‘झी युवा’चे व्यवसायप्रमुख बवेश जानवलेकर यांनी सांगितले.

हॉलीवूडमध्ये कॉमिक्सवरून सुपरहिरोपटांचे घाट घातले गेले आहेत, तर हिंदीत काही चित्रपट याआधी कॉमिक बुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आले आहेत. अक्षयकुमारच्या ‘बॉस’ या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा घेऊन चाचा चौधरी कॉमिक बुक प्रकाशित करण्यात आले होते. अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले तर ‘बाहुबली’ हा चित्रपटही कॉमिक बुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आला आहे. मात्र मालिका आणि तेही मराठी मालिकेच्या बाबतीत असा प्रयोग करण्यात आला नव्हता. ‘रुद्रम’ या मालिकेची कथा, मांडणी रहस्यमय आहे. त्यामुळे या मालिकेचा एखादा भाग जरी हुकला तरी पाहणाऱ्याला रूखरूख वाटत राहते. अशा वेळी मालिकेचे भाग पाहू न शकणाऱ्यांना त्या भागात काय घडले हे सांगणारे काही तरी हवे होते, या विचारातूनच ‘रुद्रम’ ही मालिका ग्राफिकल सीरिज रूपात प्रकाशित करण्याबद्दल विचार सुरू झाला, असे जानवेलकर यांनी सांगितले. सध्या दर आठवडय़ात मालिकेत काय घडले ते चित्रकथा रूपात डिजिटली तयार करून आठवडय़ाच्या अखेरीस ‘झी युवा’ वाहिनीच्या फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रकाशित केले जाते. आतापर्यंत असे तीन ते चार भाग प्रकाशित करण्यात आले आहेत.

‘रुद्रम’ची कथा गिरीश जोशी यांची आहे. ग्राफिकल सीरिजमध्ये सादर करतानाही मालिकेचा उत्कर्षबिंदू असलेला भाग त्यात यावा हा मुख्य विचार होता. त्यासाठी नव्याने कथा किंवा संवाद लिहिण्याची गरज नव्हती. त्यामुळे मालिकेतीलच संवाद घेऊन केवळ चित्ररूपात ते सादर केले जातात, अशी माहिती या ग्राफिकल सीरिजची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘झी युवा’च्या डिजिटल टीमची स्नेहल देशमुखने दिली. ही ग्राफिकल सीरिज अभिमान आपटे हा तरुण तयार करतो आहे. ग्राफिकल सीरिजसाठी तीन-चार ग्राफिक डिझायनर्सचे काम मागवण्यात आले होते. त्यातून अभिमानचे काम पाहून त्याची निवड करण्यात आली. सध्या दर आठवडय़ाच्या अखेरीस ‘रुद्रम’ची ग्राफिकल सीरिज प्रकाशित केली जाते आहे. मालिका संपत येईल तेव्हा या सीरिजचे संकलन करून मग ते कादंबरी स्वरूपात प्रकाशित करता येईल. आतापर्यंत मालिकेच्या बाबतीत असा प्रयत्न कधी करण्यात आला नव्हता. त्यामुळे ‘रुद्रम’चे हे खास आकर्षण ठरेल, असा विश्वास बवेश जानवलेकर यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 3:28 am

Web Title: rudram marathi serial now in graphical format zee yuva
Next Stories
1 ‘या’ अभिनेत्रीने सलमानला सहा वेळा केलं रिजेक्ट
2 सनी लिओनीला भाड्याने दिलेल्या घराचे वॉशरुम पाहून भडकली सेलेना जेटली
3 PHOTO : फुटबॉलपटू रोनाल्डिनो आणि वरुण धवनचा ‘याराना’
Just Now!
X